GOOD NEWS : सलमानने दारु आणि सिगारेटला केले बायबाय

सलमान खान बॉलिवूडमध्ये आपल्या वाईट सवयींमुळे चर्चेत असतो. मात्र आता सलमानबद्दलची ही नवीन बातमी वाचून त्याच्या चाहत्यांना निश्चितच आनंद होणार आहे. सलमानने नेहमीसाठी दारु आणि सिगारेटला रामराम ठोकला आहे. अर्थातच आता यापुढे सलमान सिगारेट किंवा दारुला स्पर्शही करणार नाही. आपल्या तब्येतीच्या कारणांमुळे सलमानने हा निर्णय घेतला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान फिट असून सध्या तो त्याला मिळालेले यश एन्जॉय करत आहे. गेल्या वर्षी सलमानला चेह-याच्या दुखण्याने हैराण करुन सोडले होते. त्या दुखण्यावर सलमानने शस्त्रक्रियाही करुन घेतली होती. शस्त्रक्रियेनंतर मध्यंतरी सलमानच्या त्या दुखण्याने डोके वर काढले होते. मात्र आता सलमानची प्रकृती ठिक आहे. पण हे दुखणे पुन्हा उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून सलमानने दारु आणि सिगारेटला कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच महिन्यांपासून सलमानने एकदाही सिगारेट किंवा दारुला स्पर्शही केला नाही. पार्टीमध्ये सलमान या गोष्टींना कटाक्षाने टाळताना दिसतो.
सलमानच्या वागण्यातही खूप फरक पडला असल्याचेही समजते. सलमान आपल्या चित्रपटांवर विशेष लक्ष देतोय. शिवाय सेटवर नेहमी उशीरा पोहचणारा सलमान आता चक्क वेळेत शुटिंग स्थळी हजेरी लावतोय. सलमानचे कुटुंबिय त्याच्या आजारामुळे चिंतेत होते. सलमानला आपल्या कुटुंबियांना दुःखी बघवत नव्हते. म्हणून त्याने आपल्या वाईट सवयींना कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवणा-या सलमानवर हिट एण्ड रनचा गुन्हा दाखल झाला होता. शिवाय दारुच्या नशेत माजी गर्लफ्रेंड्स सोमी अली आणि ऐश्वर्या राय बच्चनला मारहाण केल्याचाही आरोप सलमानवर आहे.






