करिना होणार दबंग-2 ची ‘बदनाम मुन्नी’!

नवी दिल्ली: ‘दबंग’ चित्रपटातील आयटम साँग ‘मुन्नी बदनाम हुई’ जबरदस्त हिट झाले. या गाण्याने अनेक विक्रमही प्रस्थापित केले. आता दबंगच्या पार्ट टूची चर्चा सुरू झाली असून त्यात अभिनेत्री करिना कपूर लटके-झटके देत मुन्नी सादर करणार आहे.
दबंगची ओळख सलमानच्या मॅचो मॅनमुळे जेवढी आहे तेवढीच त्यातील मुन्नी बदनाम हुई या गाण्यामुळेही. आता त्याच्या सिक्वेलवर काम सुरू झाले आहे. दिग्दर्शक अरबाज खानने करिना कपूरच्या सहभागाविषयी दुजोरा दिला आहे. करिना कपूर चांगली अभिनेत्री आहे. आमची यावर चर्चा झाली आहे. अजून तरी चित्रीकरणाला सुरुवात झालेली नाही. गाणेदेखील आणखी रेकॉर्ड होणे बाकी असल्याचे अरबाजने सांगितले.
करिना व सलमान ही जोडी 2011 मध्ये चांगली हिट ठरली होती. या जोडीचा बॉडीगार्ड हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. या चित्रपटाने सुमारे 100 कोटींचा गल्ला जमवून इतरांची हवा गूल केली होती. यावर्षी करिना ही अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा यांच्या भूमिका असलेल्या ‘रौडी राठोड’मध्ये छोटीशी व्यक्तिरेखा करणार आहे. 2013 मध्ये ‘हीरोइन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये तिची मुख्य भूमिका आहे. याचे दिग्दर्शन मधुर भांडारकर करणार आहे.
सध्या मात्र दबंग-2 ची ही बातमी बॉलीवूडमध्ये सर्वात हॉट ठरली आहे. सिक्वेलमध्ये सलमान खान, सोनाक्षी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका आहेत; परंतु दबंगच्या खलनायकाची भूमिका सोनू सूद करणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. दबंग-2 चे दिग्दर्शन अरबाज खान करणार आहे. दबंगचे दिग्दर्शन अभिनव कश्यपने केले होते. आता मलाइकाच्या सुपरहिट गाण्याचा प्रभाव पाहता करिना पहिल्या ‘मुन्नी’वर मात करते का, ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.





