प्रेक्षकांच्या मनाला भावला सत्यमेव जयते, आमिर झाला भावूक

सुपरस्टार आमिर खानचा पहिला टेलिव्हिजन कार्यक्रम 'सत्यमेव जयते' रविवारपासून छोट्या पडद्यावर दाखल झाला. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात आमिरने स्त्री भ्रूण हत्येसारख्या गंभीर विषयावर भाष्य केले.
या कार्यक्रमाविषयी रविवारी पत्रकारांशी बोलतांना आमिरने सांगितले की, माझ्या आईने हा कार्यक्रम पुण्यात पाहिला. तिला कार्यक्रम खूप आवडला असल्याचे तिने स्वतः फोन करुन मला कळवले. आईकडून मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे मी खूपच भावूक झालो आणि माझे डोळेही पाणावले. मी खूप आनंदी आहे. आमिरने पुढे सांगितले की, माझी पत्नी, शोची संपूर्ण टीम आणि मुलगा आझादबरोबर मी हा कार्यक्रम पाहिला. चित्रपटसृष्टी, ट्विटर आणि सगळ्या स्तरातून कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आमिरचा हा कार्यक्रम स्टार प्लस आणि दूरदर्शन वाहिनीवर दीड तास प्रसारित झाला. उल्लेखनीय म्हणजे खाजगी वाहिनीबरोबर दूरदर्शनवर प्रसारित होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या अनेक छोट्या गावात दिसला. ज्या भागात आजही टीव्ही पोहोचला नाही अशा गावांमध्ये खास टीव्ही संच लावून हा कार्यक्रम लोकांना दाखवण्यात आला.
आमिरच्या या कार्यक्रमाला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून आमिरने 'सत्यमेव जयते डॉट कॉम' या साईटवरुन प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद व्यक्त केला आहे. कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाल्यानंतर ट्विटरवर या कार्यक्रमाची प्रशंसा करणारे तब्बल २२५४ ट्विट आमिरला मिळाले. किरण बेदी यांनी ट्विट केले की, मी आमिरच्या या कार्यक्रमाला पूर्णपैकी पूर्ण गूण देते. हा कार्यक्रम रचनात्मक, सत्यघटनेवर आधारित, भावनिक रुपाने लोकांना जोडणारा कार्यक्रम आहे.
अभिनेत्री प्रिती झिंटाने ट्विट केले की, आमिर खानला कार्यक्रमात स्त्री भ्रूण हत्येवर चर्चा करतांना पाहिले, आमिरचे प्रयत्न कौतूकास्पद आहे. एक स्त्री म्हणून मी त्याला धन्यवाद देते.
दिया मिर्झाने ट्विट केले की, मला पूर्वीपासूनच छोट्या पडद्यावर असे काही वेगळे बघायचे होते. लोकांना जागृत करण्यासाठी आमिरचे धन्यवाद.






