‘जॅकी पुत्र’चे बॉलीवूडमध्ये लॉँचिंग

मुंबई- ‘हीरो’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आलेल्या जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर हादेखील आता नायक म्हणून रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. प्रख्यात निर्माता साजिद नाडियाडवालाने आपल्या नव्या चित्रपटासाठी टायगरला नायक म्हणून नुकतेच साइन केले. जॅकी श्रॉफने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, टायगरला स्वत:च्या मेहनतीवर चित्रपट मिळाला याचा आम्हाला खूप आनंद आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून जॅकीचा प्रचंड हँडसम दिसणारा टायगर चित्रपटात येणार असल्याची चर्चा होती. सर्वप्रथम त्याला सुभाष घई लाँच करणार असल्याची बातमी होती. त्यावेळेस जॅकीशी बोलताना चर्चा सुरू असल्याचे त्याने कबूल केले होते. आमिर खानही टायगरला घेऊन अॅक्शन चित्रपट काढणार अशी चर्चा होती. फरहान अख्तर, रितेश सिधवानीही टायगरला घेऊन चित्रपट काढणार असल्याचे बोलले जात होते. परंतु यापैकी एकानेही टायगरला साइन केले नाही. मात्र साजिद नाडियाडवालाने त्याला पहिला चित्रपट दिला.
साजिद नाडियाडवालाने टायगरला चित्रपटासाठी साइन केले, त्यावेळी जॅकी आणि त्याची पत्नी आयशाही या वेळी उपस्थित होते. टायगरच्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कम्बख्त इश्क फेम तरुण दिग्दर्शक सबीर खानवर सोपविण्यात आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टायगरचा हा पहिला चित्रपट रोमँटिक अॅक्शनपट असेल. त्याचे चित्रीकरण डिसेंबर महिन्यापासून लंडन, स्विर्त्झलँड आणि काश्मीरसह मुंबईत चित्रीकरण केले जाणार आहे. टायगरच्या नायिकेसाठी नवीन चेहरा शोधला जात आहे.
‘हिरा पन्ना’ची आठवण : जॅकी श्रॉफ
सुभाष घई, आमिर खान यांनी टायगरला पाहिल्यानंतर त्याच्याबरोबर चित्रपट करू असे त्यांनी म्हटले होते. बॉलीवूडमध्ये सगळ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. परंतु मी कधीही त्याचा गैरफायदा घेतला नाही. आज टायगरने पहिला चित्रपट साइन केला याचा मला आणि आयशाला खूप आनंद झाला आहे. देव आनंद यांनी जेव्हा ‘हीरा पन्ना’मध्ये मला सर्वप्रथम काम दिले तेव्हा माझ्या घरी कोणालाही मी हे कळवले नव्हते असेही जॅकीने सांगितले.





