मुंबई - ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ या चित्रपटातून अभिनेत्री रविना टंडनने बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले. चित्रपटांचा एक काळ गाजवलेल्या रविनाला ब-याच वर्षांनी प्रेक्षकांनीही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, रविनाने आता आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. एनडीटीव्ही चॅनलवर प्रक्षेपित होणा-या ‘इसी का नाम जिंदगी’ या नवीन शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत रविना आपल्या चाहत्यांना साद घालणार आहे. मोठ्या पडद्यावर चमकणा-या ता-यांच्या आयुष्याबद्दल सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. मोठमोठ्या घरांमध्ये राहणा-या प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान अशा सेलिब्रिटीजनी केलेले स्ट्रगल आणि त्यांचे अनुभव ‘इसी का नाम जिंदगी’ या कार्यक्रमात मांडले जातील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविना टंडन करणार असल्याने कार्यक्रमाला आधीच ग्लॅमर मिळाले असल्याचे या चॅनलचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आधारित ‘जीना इसी का नाम है’ या कार्यक्रमाने अभिनेते फारूक शेख यांच्या निवेदनाच्या जोरावर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. तेव्हा रविना टंडनचे निवेदन त्या तोडीस होईल का, असे विचारले असता रविनाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, असे चॅनलच्या अधिका-यांनी सांगितले. ‘सेलिब्रिटिज’च्या मागचा माणूस दाखवण्याचा प्रयत्न असलेला हा कार्यक्रम 26 फेब्रुवारीपासून एनडीटीव्ही चॅनलवर पाहता येईल.