मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेत आणि स्टॉकिस्टकडून झालेली जोरदार खरेदी यामुळे सोने आणि चांदी तेजीत आले. गेल्या दोन सत्रांत काहीशी घसरण अनुभवणा-या सोन्याचे भाव तोळ्यामागे 165 रुपयांनी वधारून 28,160 रुपये या पातळीवर आले. चांदीच्या भावातही किलोमागे 370 रुपये वाढ होऊन भाव 56,520 रुपयांवर पोहोचले.
ग्रीसला बेलआऊट पॅकेज देण्याबाबत युरोपीय संघातील 17 देशांनी सहमती दर्शवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने तेजीत राहिले. ही तेजी एवढी होती की, तेथील बाजारात सोन्याने दीड आठवड्यांचा उच्चांक गाठला. लंडन बाजारात सकाळच्या सत्रात सोन्याचे भाव प्रतिऔंस 1740.35 डॉलरवर होते. देशातील बाजारात मोठी मागणी आल्याने सोन्याला भाव आला, तर औद्योगिक क्षेत्रातून मोठी मागणी आल्याने तेजीने चांदी चकाकली.