32 वर्षांच्या महत्त्वाच्या खर्चाचे असे करा नियोजन

आपला दैनंदिन खर्च पगारातून भागवला जातो. घर किंवा कार खरेदी करण्यासाठी जास्त पैशांची गरज भासते. त्यामुळे भविष्यातील पैशाची गरज समजून घेतली पाहिजे. तरच आपण चार वर्षांनंतर मुलीच्या शिक्षणासाठी चार लाख रुपये, त्यानंतर दहा वर्षांनी लग्नासाठी दहा लाख रुपये, 16 वर्षांनंतर सेवानिवृत्तीनंतरच्या खर्चासाठी पन्नास लाख रुपयांची आवश्यकता भासेल, असे म्हणू शकू. त्यासाठी आपली बचत करण्याची क्षमता आणि सवयी समजून घेणे आवश्यक आहे. जर आपण बचतीचे पैसे चार टक्के व्याज देणा-या बचत खात्यातच राहू दिले तर ते पॅसेंजर रेल्वेच्या गतीने वाढतील. या पैशांमध्ये वाढ होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागेल. 32 वर्षांचा प्रचंड खर्च भागवण्यासाठी हा काही योग्य पर्याय होऊ शकत नाही. अशा वेळी गुंतवणुकीच्या पर्यायाची उत्पन्न व वाढ या दोन भागांत विभागणी करा. गुंतवणुकीसाठी बचत योजना, डिपॉझिट, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड आणि शेअर आदी खरेदी करू शकता. निवांत असलेले लोक बचत योजना, डिपॉझिट, बाँड्समध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यामध्ये जोखीम आणि परतावा कमी असेल; परंतु नियमित उत्पन्न मिळत राहते. जास्त जोखीम पत्करू शकणारे लोक शेअर, रिअल इस्टेट आणि सोन्यामध्ये गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकतात. त्यात परतावा चांगला मिळेल आणि खर्चाच्या गरजाही भागवता येऊ शकतील.





