मुंबई: महिंद्र समूह आणि किरण एनर्जी यांच्या संयुक्त सहकार्यातून स्थापन झालेल्या महिंद्रा सोलार वन या कंपनीने सौर ऊर्जा निर्मितीसाठी 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. त्याचबरोबर येत्या दोन वर्षांत 100 मेगावॉट सौर ऊर्जा क्षमता उभारण्याचाही विचार कंपनीने केला आहे. येत्या पाच वर्षांच्या कालावधीत सौर उद्योगातील तिसर्या क्रमांकाची अव्वल कंपनी बनण्याचे कंपनीचे लक्ष्य असल्याचे महिंद्रा अँड महिंद्राचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्र यांनी सांगितले.
महिंद्रा सोलार वन या कंपनीने ग्रीडला जोडण्यात आलेला राजस्थानमधील पहिला 5 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा विभाग कार्यान्वित केला असल्याचे स्पष्ट करून आनंद महिंद्र पुढे म्हणाले की, महिंद्रा क्लीनटेक व्हेंचरच्या माध्यमातून महिंद्रा समूहाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला आहे. महिंद्रा क्लीनटेक व्हेंचर्सचे ऊर्जा उत्पादनासाठी महिंद्रा सोलार, सौर ऊर्जा प्रकल्पांच्या अभियांत्रिकी कामासाठी महिंद्रा ईपीसी आणि सौर ऊर्जा निर्मितीच्या उद्देशाने महिंद्रा ऑफ ग्रीड सोल्युशन्स असे तीन विभाग सुरू करण्यात आले आहे. येत्या 3 ते 5 वर्षांत अन्य पारंपरिक ऊर्जास्रोतांचा शोध कंपनी घेणार असली तरी मुख्य भर हा सैर ऊर्जेवर असेल, असेही ते म्हणाले.
सौर ऊर्जा क्षेत्राचे आकर्षण अन्य कंपन्यांनाही देशातील सौर ऊर्जा क्षेत्राकडे अलीकडच्या काही वर्षांत अनेक कंपन्या आकर्षित झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने टाटा, अनिल अंबानी यांची रिलायन्स पॉवर, जीएमआर आणि अदानी समूह यांचा समावेश आहे. अदानी समूहाने गेल्याच आठवड्यामध्ये 40 मेगावॅट क्षमतेचा देशातील सर्वात मोठा सौर ऊर्जा विभाग कार्यान्वित केला.
सध्या देशातील सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 250 मेगावॅट असून 2020 पर्यंत ती 20 हजार मेगावॅटपर्यंत देण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये विदेशी कंपन्याही स्वारस्य घेत आहेत.