मुंबई: मागील तिमाहीतील घसरणीचा कल कायम राखताना म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता डिसेंबर अखेर संपलेल्या कालावधीत 10.3 टक्क्यांनी घटली आहे. अग्रीम करभरणामुळे म्युच्युअल फंडाच्या कर्ज योजनांमधील व्यवस्थापनाखालील मालमत्ता प्रत्येक तिमाहीत घसरत असल्याचे दिसून आले आहे.
डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीमध्ये म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता अगोदरच्या महिन्यातील 6.81 लाख कोटी रुपयांवरून 6.11 लाख कोटी रुपयांवर आली. लिक्विड / मनी मार्केट हार फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता सर्वाधिक 27 टक्क्यांनी घसरली आहे; परंतु अन्य वर्गातील फंडांमध्ये हे घसरणीचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.गेल्या संपूर्ण वर्षभरात व्याजदराचे प्रमाण चढे राहिल्याने गुंतवणूकदार संस्थांकडून लिक्विड / मनी मार्केट फंडांना जास्त पसंती मिळाली. बॅँकांना म्युच्युअल फंडांतील व्यवहार कमी करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅँकेने दिल्यानंतर या फंडात घसरण सुरू झाली; परंतु रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशानंतर सर्वच बॅँकांनी तातडीने रक्कम काढून घेण्यास सुरुवात केली असे झाले नाही. काही बॅँकांनी म्युच्युअल फंडांतील व्यवहार कमी करण्यासाठी डिसेंबर ही डेडलाइन होती.