‘स्टारबक्स’ कॉफीच्या प्याल्यातील वादळ

सिएटल- नवीन योजना आणि धोरणांमुळे स्टारबक्स एक्सप्रेसो कॉफीप्रमाणे ढवळून निघाली आहे. मागील तिमाहीत कंपनीच्या जगभरातील 17 हजार स्टोअर्सची विक्री 15 टक्क्यांनी वाढत 17 हजार कोटींच्या घरात गेली आहे. विश्लेषकांच्या मते कंपनीची विक्री वर्षभरात 74 हजार कोटींचा आकडा गाठू शकते.
कंपनीने आता ज्यूस आणि बेकरी व्यवसायाचा विस्तार करत नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. ‘इव्हॉल्युशन फ्रेश’ आणि ‘ला बोलांगे चेन’ या दोन कंपन्यांचे अधिग्रहण करत स्टारबक्सने सा-यांना आवाक् केले आहे. या वर्षात अमेरिकेत 300 स्टोअर्स नव्याने सुरू करण्याचा विचार कंपनी करत असून, यातील काही स्टोअर्समध्ये बिअर, वाइन आणि जेवणाची सुविधा उपलब्ध असेल. लाइट कॉफीचे चाहते असणा-या 40 टक्के ग्राहकांसाठी जानेवारी महिन्यात ब्लांड नावाची नवीन कॉफी कंपनीने बाजारात आणली आहे. चीनमध्येही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढीचा निर्णय कंपनीने घेतला असून, कंपनीच्या इतिहासात प्रथमच ग्राहकांच्या संख्येत इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे शुल्ज यांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील वाढत्या बेरोजगारीवरही कंपनीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, कंपनीच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ‘क्रिएट जॉब फॉर यूएएस’ हे मोठे अभियानही राबवण्यात येत आहे. कंपनीने लवकरच ‘इनडिविसिबल’ ब्रॅँड बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यात कॉफी मगसोबत इतर काही वस्तूंचाही समावेश असेल. विक्रीच्या माध्यमातून मिळणा-या उत्पन्नाचा काही भाग अमेरिकेत राबवण्यात येणा-या अभियानासाठी खर्च केला जाणार आहे.
हॉवर्ड शुल्ज हे त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांसाठीही ओळखले जातात. कंपनीवर आर्थिक संकट ओढावल्यानंतर सिएटल येथील कंपनीच्या मुख्यालयात नोकरकपात करण्याची वेळ आली होती. यावर तोडगा काढण्यासाठी न्यूऑरलिएंसमध्ये कंपनीने स्टोअर्स व्यवस्थापकांची बैठक बोलावली होती. कंपनीची अवस्था अत्यंत बिकट असल्याची कल्पना देण्यासाठी शुल्ज यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये धोरण राबवण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. पहिल्या टप्प्यात कंपनीकडे तसेच स्टोअर्समध्ये उपलब्ध साधनांचा योग्य पद्धतीने वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदीच्या काळातही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासोबतच तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा देण्यावरही भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
स्टारबक्स
एकप्रकारे फेसबुक जनरेशनचे कॉर्पोरेट हेडकॉटर असल्याचे बोलले जाते. कंपनीचे अनेक अधिकारी कंपनीच्या वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांच्या नवीन कल्पना जाणून त्याची अंमलबजावणी करता येईल का याचा सतत विचार करत असतात. वर्षभरातच फेसबुक आणि व्टिटरसारख्या
सोशल साइटवर कंपनीने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.
साडेतीन कोटी फॉलोअर
फेसबुकवर स्टारबक्सचे जवळपास साडेतीन कोटी फॉलोअर्स आहेत. यामुळे कंपनीच्या जाहिरात खर्चात मोठी कपात झाली आहे. अनेक ग्राहक कंपनी वेबसाइटच्या माध्यमातून कंपनीशी जोडले गेले असल्याने कंपनीला मोबाइल पेमेंटची सेवा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दर आठवड्याला जवळपास दहा लाखांवर ग्राहक मोबाइलच्या माध्यमातून पेमेंट करत असल्याने कंपनीला मोठा फायदा झाला आहे. कंपनीने केवळ फायद्याचाच विचार न करता आपल्या धोरणात आमूलाग्र बदल केल्याने मागील 18 महिन्यांमध्ये कंपनीच्या सर्वच स्टोअर्सला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.
सामाजिक जबाबदारी
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने अपॉर्च्युनिटी फायनान्स नेटवर्क (ओएफएन)सोबत आपले अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून कंपनीने आतापर्यंत पाच कोटींचा निधी संकलित केला आहे. यात स्टारबक्स फाउंडेशनने अभियानासाठी सर्वाधिक 27.5 कोटींचे अर्थसाहाय्य केले आहे. एखादा रोजगार निर्माण करण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी 11.75 लाख रुपयांची गरज असल्याचे ओएफएनचे अध्यक्ष मार्क पिंक्सी यांचे म्हणणे आहे. स्टारबक्स एक रोजगार निर्माण करण्यासाठी 1.68 लाख रुपये जमा करते. कंपनीने आतापर्यंत या माध्यमातून 3500 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एकेकाळी स्टारबक्सचे भविष्य अंधकारमय असेल असे वाटत असतानाच दोन वर्षांच्या कालावधीत कंपनीने आखलेल्या धोरणांमुळे कंपनीचा चेहरा-मोहराच बदलल्याचे शुल्ज यांचे म्हणणे आहे. अनेक तज्ज्ञांनीही स्टारबक्समध्ये झालेले सकारात्मक बदल मान्य केले आहेत.





