मुंबई - मंगळवारच्या सत्रात आलेल्या तेजीने 7 महिन्यांचा उच्चांक गाठणा-या सेन्सेक्सला बुधवारी नफेखोरीचा चांगलाच फटका बसला. गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रमाणात केलेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स 283 अंकांनी घसरून 18,145.25 या पातळीवर बंद झाला. युरोपातील बहुतेक बाजारांतील नकारात्मक सुरुवातीने सेन्सेक्सच्या घसरणीला अधिक हातभार लागला. बाजारातील डेरिव्हेटिव्हज सौदापूर्तीच्या आधी गुंतवणूकदारांनी विक्रीला पसंती दिली. रिअॅल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स, धातू, बँकिंग, ऊर्जा, सार्वजनिक उद्योग आणि भांडवली वस्तू या क्षेत्रांतील समभागांना विक्रीचा जोरदार फटका बसला.
आर्थिक संकटात सापडलेल्या किंगफिशर एअरवेजला 1200 कोटींचे अर्थसाहाय्य देण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने सकारात्मक कौल दाखवल्याचा परिणाम या समभागांना भोगावा लागला. एसबीआयच्या समभागांत 7.91 टक्क्यांची घसरण दिसून आली. इतर हेवी वेट समभागांतील घसरणीने सेन्सेक्सच्या पडझडीला अधिक हातभार लावला आणि सेन्सेक्स 283.36 अंकांनी घसरून 18,145.25 या पातळीवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकही 101.80 अंकांची घसरून 5,505.35 वर बंद झाला. जागतिक स्तरावर संमिश्र वातावरण होते. आशियातील चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान बाजारात तेजीचे वातावरण होते, तर सिंगापूर बाजार घसरणीसह बंद झाला. युरोपातील बाजारात मात्र युरोझोन वित्तीय संकटामुळे मंदीचे वातावरण होते. मुंबई शेअर बाजारातील 13 पैकी 12 क्षेत्रीय निर्देशांकात घसरण दिसून आली, केवळ बीएसई-आयटी निर्देशांक तेजीत बंद झाला.