मुंबई - जागतिक शेअर बाजारांतील स्थिर वातावरण, महागाई कमी झाल्यामुळे व्याजदर कमी होण्याच्या उंचावलेल्या आशा आणि त्यातच ‘एफआयआय’कडून बाजारात येत असलेला निधीचा ओघ या सगळ्या सकारात्मक गोष्टींमुळे बाजारात तुफान खरेदी होऊन सेन्सेक्सने 354 अंकांची उसळी घेतली. विशेष म्हणजे सेन्सेक्सच्या पातळीने तब्बल सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा 18 हजार अंकांचे शिखर सर केले.
गेल्या दोन सत्रात सेन्सेक्सने अगोदरच 100 अंकांची कमाई केली होती; परंतु आजच्या खरेदीमुळे त्यात आणखी 353.83 अंकांची भर पडली. बाजारातील खरेदीच्या उत्साहामुळे सेन्सेक्स ऑगस्टनंतर पहिल्यांदाच 18,202.41 अंकांच्या पातळीवर बंद झाला. केवळ सेन्सेक्सच नाही तर निफ्टीनेही दमदार 115.90 अंकांची वाढ नोंदवत 5,500 अंकांची पातळी ओलांडून 5531.95 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
चलवाढीने गेल्या दोन वर्षांचा गाठलेला नीचांक हाच बाजाराचे मनोबल उंचावण्याचे मुख्य कारण होते. रिझर्व्ह बॅँक मार्च महिन्यातील पतधोरण आढाव्यात व्याजदरात कपात करण्याची मोठी आशा बाजाराला आता वाटत आहे. त्यामुळेच बाजारात वाहन, भांडवली वस्तू, बॅँका आणि स्थावर मालमत्ता समभागांवर गुंतवणूकदार तुटून पडले.
जागतिक शेअर बाजारातील स्थिर वातावरण आणि मुख्य म्हणजे ग्रीसच्या कर्ज समस्येवर उपाय निघण्याचे मिळत असलेले संकेत यामुळेही गुंतवणूकदारांना
मोठा दिलासा मिळाला.
‘एफआयआय’ने वाढला उत्साह - विदेशी गुंतवणूकदार संस्था भांडवल बाजारात सातत्याने भारतीय समभागांची खरेदी करीत आहेत. मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 1030.12 कोटी रुपयांची समभाग खरेदी केल्यामुळे गुंतवणूकदारांमधील उत्साह आणखी वाढला आहे.
टाटा मोटर्सच्या समभागांना मागणी - जग्वार लॅँड रोव्हरच्या चमकदार कामगिरीमुळे टाटा मोटर्सच्या निव्वळ नफ्यामध्ये डिसेंबरअखेर संपलेल्या तिस-या तिमाहीत 41 टक्क्यांची वाढ होऊन तो 3405 कोटी रुपयांवर तर संकलित महसूल वार्षिक 44 टक्क्यांनी वाढून 45,260 कोटी रुपयांवर गेला. त्यामुळे टाटा मोटर्सच्या समभागांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. परिणामी कंपनीच्या समभाग किमतीत 7 टक्क्यांनी वाढ होऊन तो 286 रुपयांवर गेला. मारुती सुझुकी आणि महिंद्रा अॅँड महिंद्राच्या समभागांनादेखील मागणी आली.
अल्फा लाव्हलच्या डिलिस्टिंगला प्रतिसाद - अल्फा लाव्हलच्या डिलिस्ंिटगला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनी डिलिस्ंिटग ऑफरमध्ये एकूण 20,40,202 समभागांची फेरखरेदी करणार आहे. पहिल्या दिवशी 1,68,334 समभागांचे व्यवहार शेअर बाजारात झाले. ही समभाग फेरखरेदी 22 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.