Home » Business » Auto » Tata Motors New Air Car

टाटा मोटर्सची आता हवेवर चालणारी मिनीकॅट कार

संतोष काळे | May 11, 2012, 04:02AM IST
टाटा मोटर्सची आता हवेवर चालणारी मिनीकॅट कार

मुंबई - दारात कार असावी ही लाखो मोटारप्रेमींची इच्छा ‘नॅनो’च्या रूपाने पूर्ण करणार्‍या टाटा मोटर्सने आता हवेवर चालणार्‍या मोटारीसाठी कंबर कसली आहे. या आगळय़ा मिनीकॅट मोटारीच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ‘एमडीआय’च्या एअर इंजिन तंत्रज्ञानाची चाचणी टाटा मोटर्सच्या वाहनांवर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. यामुळे ही कार प्रत्यक्षात येण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असला तरी ती नेमकी बाजारात केव्हा येणार हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.भारतात ‘एमडीआय’ तंत्रज्ञान वापरातून हवेवरील कारची निर्मिती-विक्री करण्याबाबत टाटा मोटर्सने जानेवारी 2007 मध्ये लक्झेम्बर्गमधील मोटर डेव्हलपमेंट इंटरनॅशनल (एमडीआय) कंपनीबरोबर करार केला होता. त्याच्या पहिल्या टप्प्यानुसार तंत्रज्ञान हस्तांतर व तांत्रिक संकल्पनेचा दाखला, तर दुसर्‍या टप्प्यात ‘कॉम्प्रेस्ड एअर इंजिना’चा विशिष्ट वाहनामध्ये संपूर्ण विकास करण्याचे काम होते, असे 7 मे रोजी संकेतस्थळावर म्हटले आहे. टाटाच्या दोन वाहनांत कॉम्प्रेस्ड एअर इंजिन बसवण्याची संकल्पना यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.

लवकरात लवकर उत्पादन बाजारात आणण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा संपूर्ण विकास व तंत्रज्ञान प्रक्रियेची आखणी करण्यासाठी उभय कंपन्या काम करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

15 वर्षांचे अथक परिश्रमएमडीआयशी झालेल्या करारानंतर 3 ते 4 वर्षांत मोटार बाजारात आणण्याची योजना होती. परंतु हवेवरील मोटार बनवण्याचे काम सोपे नव्हते. त्यामुळे प्रकल्पाला विलंब झाला. फॉर्म्युला वन मोटारीचे इंजिनिअर गाय नेगरे यांनी 15 वर्षांच्या अथक पर्शिमानंतर हवेने चालणारे इंजिन तयार करण्यात यश मिळवले. पेट्रोल, डिझेलऐवजी हवेवर चालणार्‍या मोटारची निर्मिती करण्याच्या उद्देशानेच नेगरे यांनी कंपनीची स्थापना केली होती. त्यांचे हे स्वप्न आता साकार होणार आहे.

Email Print
0
Comment