मोबाईल युजर्स सावधान. तुमच्या मोबाईल फोनवर जर एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन मिसकॉल आला, तर त्याला प्रत्युत्तर देण्याच्या नादात तुमच्या अकाऊंटमधून मोठी रक्कम वजा होण्याची शक्यता आहे.
व्होडाफोनने त्यांच्या ग्राहकांसाठी प्रसिद्ध केलेल्या सुचनांवर सर्वच मोबाईल कंपन्यांच्या युजर्सने लक्ष देण्याची गरज आहे.
व्होडाफोनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमच्या ग्राहकांसोबत झालेल्या या तक्रारी अन्य टेलिकॉम कंपन्यांसोबतही होऊ शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन आलेल्या कोणत्याही मिसकॉलला प्रत्युत्तर देण्याआधी थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे.
व्होडाफोन वापरणा-या काही ग्राहकांना मागील दोन-तीन दिवसांमध्ये त्यांच्या मोबाईलवर, आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन मिसकॉल येत आहेत. त्यांना प्रत्युत्तरात कॉल केल्यानंतर, त्यांच्या अकाऊंटमधून मोठी रक्कम त्या कॉल चार्जच्यापोटी वजा केली जात असल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. हे कॉल प्रामुख्याने +224, +92 आणि +23 हे सुरुवातीचे क्रमांक असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून येत आहेत. या तक्रारी उत्तर प्रदेश, तमिळनाडूसह अनेक राज्यात नोंदविल्या गेल्या असून त्यांच्यात वाढ होत आहे.