अनेक देशांप्रमाणे भारतदेखील जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) प्रणालीचा वापर करतो. परिणामी अमेरिका स्वत:च्या फायद्याकरिता जागतिक स्तरावर होणा-या माहितीच्या आदान-प्रदानावर सहजगत्या नियंत्रण ठेवू शकते. इराक आणि अफगाणिस्तान युद्धानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा जीपीएसच्या वापराबाबत अधिक सजग झाल्या आहेत. ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा आणि त्याच्या गुप्त निवासस्थानावर झालेला अचूक हल्ला म्हणजे जीपीएस यंत्रणा जगभरात सर्वत्र लक्ष ठेवून असल्याचा पुरावा आहे. तिच्यापासून कोणी काहीही लपवून ठेवू शकत नाही. तिच्या सान्निध्यात जगाच्या कानाकोप-यात होणारी कुठल्याही माहितीची देवाणघेवाण अजिबात गोपनीय नाही. ही यंत्रणा ताब्यात असल्यामुळे अमेरिकनांना कुठेही मुक्तद्वार आहे. सायबरविश्वातील कुठलीही माहिती, संवाद, संदेश, पत्रे, फॅक्स आदी गोष्टी यत्किंचितही गुप्त नसल्याचे विकिलीक्सने दाखवून दिले आहे. त्यामुळेच फेसबुक आणि गुगलवर सेन्सॉरशिप प्रस्थापित करण्याच्या आणि अमेरिकानियंत्रित जीपीएसवर बंधने आणण्यासह एकंदर सायबरविश्व आपल्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हालचाली सध्या भारताकडून सुरू आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ‘ग्लोनास’च्या वापराविषयी विचार सुरू केला असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या या हालचालींकडे पाहता येईल. महत्त्वाचे संदेश मिळवण्यासाठी ‘ग्लोनास’चा वापर करण्यासंदर्भात भारताने नुकताच रशियाशी करार केला आहे, या गोष्टीची टीव्ही अथवा वृत्तपत्रांमध्ये दखल घेण्यात आलेली नाही. मागील महिन्यात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या मॉस्को भेटीदरम्यान झालेल्या महत्त्वाच्या करारांमध्ये ‘ग्लोनास’च्या वापराचा करारही अंतर्भूत होता, याकडे प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष केले. हा करार भारतीय क्षेपणास्त्र प्रणालींची अभेद्यता आणि बचावात्मकता सुरक्षित राखण्यासाठी उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी या कामी पुढाकार घेतला होता. अमेरिकेची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले.
‘ग्लोनास’विषयी रशियाकडून उपलब्ध केल्या गेलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही प्रणाली दोन ‘फ्रिक्वेन्सी बँड’वर कार्य करते. अवकाशात तैनात करण्यात आलेले उपग्रह या ‘फ्रिक्वेन्सीज’च्या माध्यमातून गोपनीय (कोडेड) संदेश पाठवत असतात. तिच्या वापरकर्त्यांना पृथ्वीच्या पाठीवर कुठेही हे संदेश मिळवता येतात. तसेच उपग्रहांचे अवकाशातील स्थान आणि वेगदेखील निश्चित करता येतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, ‘ग्लोनास’ ही अमेरिकेच्या जीपीएसला पर्याय म्हणून रशियाने विकसित केली आहे. रशियन सरकारच्या अखत्यारीत येणा-या ‘रशियन स्पेस फोर्सेस’चे तिच्यावर नियंत्रण आहे. रशियन सरकारच्या संरक्षण खात्याच्या ‘द को-ऑर्डिनेशन सायंटिफिक इन्फर्मेशन सेंटर’ (केएनआयटी)च्या माध्यमातून ‘ग्लोनास’चे काम चालते. तीन भ्रमणकक्षांमध्ये 21 उपग्रह आपल्या निश्चित कक्षांतून मार्गक्रमण करत असतात. त्यांच्या जोडीला आणखी 3 अतिरिक्त उपग्रह अधिकची खबरदारी म्हणून तैनात करण्यात आले आहेत. या तिन्ही भ्रमणकक्षांची 120 अंशांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. एकाच भ्रमण कक्षेत (ऑर्बिटल प्लेन) फिरणा-या उपग्रहांनी एकमेकांशी 45 अंशांचा कोन केलेला आहे. प्रत्येक उपग्रह 19100 किलोमीटरच्या कक्षेत 64.8 अंश कोनामध्ये फिरत असतो. या प्रत्येक उपग्रहाला कक्षाभ्रमण पूर्ण करण्यास सुमारे 11 तास 15 मिनिटांचा कालावधी लागतो. ‘ग्लोनास’ची ग्राउंड कंट्रोल सिस्टिम पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत संघराज्याच्या प्रदेशात स्थित आहे. तिचा नियंत्रण कक्ष मॉस्कोत आहे. सेंट पीटर्सबर्ग, टेर्नापोल, एनिसेस्क व कोमसोमोल्स्क-ना-अॅम्युर या ठिकाणी तिचे ‘टेलिमेट्री’ व ‘ट्रॅकिंग स्टेशन्स’ आहेत. ‘ग्लोनास’ यंत्रणेतील पहिला उपग्रह 1982 मध्ये अंतराळात सोडण्यात आला होता. ‘ग्लोनास’ने निर्धारित उंची आणि कोन साधावा यासाठी अंतराळात 19100 किलोमीटरवर दोन एटेलॉन जिओडेटिक उपग्रहदेखील सोडण्यात आले होते. ‘ग्लोनास’ पूर्णत: कार्यरत होण्यासाठी 1991 हे वर्ष निश्चित करण्यात आले होते. पण 1996च्या सुरुवातीपर्यंत ते पूर्ण होऊ शकले नाही. रशियन अध्यक्षांच्या वटहुकमाने 21 सप्टेंबर 1993 रोजी ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे घोषित करण्यात आले.
सत्तर आणि ऐंशीच्या दशकावर वरचष्मा राहिला तो क्षेपणास्त्रधारी- क्षेपणास्त्ररोधी राजवटीचा! शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर ही राजवट समाप्त झाली. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय शह-काटशहाचे राजकारण तिने ढवळून काढले होते. अर्थातच शीतयुद्धातील प्रमुख प्रतिस्पर्धी सोव्हिएत युनियन आणि अमेरिका होते. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर या जागतिक क्षेपणास्त्र राजवटीने आपले राजकीय रुपडे बदलले खरे; परंतु विसाव्या शतकाच्या अस्ताच्या काळात तितक्याच भयानक युद्धशास्त्राचा उदय झाला. तेव्हा माहितीआधारित क्षेपणास्त्र युद्धतंत्र जम बसवू लागले होते. अमेरिकेचे नियंत्रण असलेल्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमने केवळ माहितीचा साठा करणे व तिच्यावर नियंत्रण ठेवण्यापुरते आपले उद्दिष्ट मर्यादित न ठेवता मानव जातीच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य केले. जीपीएसला रशियाने शोधून काढलेला पर्याय म्हणजे ग्लोनास (द ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम)! दोन्हीही प्रणाली सारख्याच असून समान शास्त्रीय तत्त्वांवर कार्य करतात.