बीजिंग - चिनी बाजारपेठेतील हिस्सा घसरताच सरकारने लादलेल्या सर्व अटी-शर्ती मान्य करून गुगलने सपशेल लोटांगण घातले आहे. त्यामुळे भारताचा अरुणाचल प्रदेश गुगलच्या नकाशामध्ये चीनचा भाग म्हणून दाखवणेही गुगल कंपनीला मान्य करावे लागणार आहे.
गेल्या वर्षीपासून गुगलच्या ऑनलाइन मॅपिंगची बाजारपेठ 10 टक्क्यांनी घसरली आहे. गुगलला स्थानिक प्रतिस्पर्धी बैदू इन्कॉर्पोरेशनने चांगलेच जेरीस आणले आहे. बैदूचा बाजारपेठेतील हिस्सा 61 टक्के एवढा आहे, असे अधिका-यांनी सांगितले. अगोदर जे गुगल मॅप आघाडीवर होते. तेच आता तिस-या स्थानी जाऊन पडले आहे, असे अभ्यासातून स्पष्ट झाल्याचे ‘चायना डेली’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. परंतु सध्या गुगल मॅपिंगने आपली आघाडी गमावली आहे. एक वर्षाच्या खंडानंतर चीनच्या बाजारपेठेत येण्याचे वेध लागलेल्या गुगलने चीन सरकारकडे औपचारिक अर्जदेखील सादर केल्याचे सांगण्यात येते.
चीनच्या मर्जीनुसार व्यवसाय - व्यवसाय परवाना मिळवण्यासाठी चिनी सरकारने सन 2010 मध्ये कडक अटी व शर्ती लागू केल्या आहेत. चिनी कंपनीच्या भागीदारीतच व्यवसाय करता येईल. त्यामुळे गुगलने बीजिंग गुझियांग या माहिती तंत्रज्ञान कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
ऑनलाइन मॅप ऑपरेटर्सना चीन सरकारच्या परराष्ट्र धोरण व भूमिकेप्रमाणेच नकाशे दाखवता येतील. चीनच्या अधिकृत ऑनलाइन नकाशामध्ये अरुणाचल प्रदेश हा चीनच्या अखत्यारीतील तिबेटमध्ये दाखवण्यात आला आहे.
48,000 - डाटा प्रोव्हायडर वेबसाइट्स चीनमध्ये असून त्यातील 60 टक्के कंपन्यांनी मागील वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत गुगल मॅपिंगची सुविधा वापरली होती.