इस्लामाबाद - राष्ट्राध्यक्ष झरदारींविरोधातील भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा सुरु करण्यासाठी गिलानी तुम्ही स्वीस अधिका-यांना पत्र लिहाच.अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याबदद्ल कारवाई अटळ आहे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना दिला.काळ्या पैशांच्या प्रकरणात राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्यावरील खटले पुन्हा सुरू केले पाहिजेत. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. अगदी झरदारीदेखील नाहीत, असे पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
काळ्या पैशाला वैध करण्याचा खटला झरदारी यांच्यावर आहे. या संदर्भातील खटले सुरू झाले पाहिजेत. तसे झाले तर पंतप्रधानांच्या विरोधातील सुनावणी रद्द करण्यात येईल, असे मुख्य न्यायाधीश इफ्तिखार चौधरी यांनी म्हटले आहे. झरदारी यांच्यावरील खटल्याचा फेरआढावा घेण्यासंदर्भात न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका गिलानी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात गिलांनी यांनी आपल्या विरोधातील समन्सला आव्हान दिले. त्यावरील सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती चौधरी यांनी हे वक्तव्य केले.सोमवा, 13 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने गिलानीने दिले होते.
गिलानी कात्रीत - न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल गिलानी यांना सोमवारी न्यायालयात हजर राहायचे आहे.त्यामुळे स्वीस सरकारला पत्र लिहीण्यासाठी गिलानींकडे आता केवळ तीन दिवसांचा वेळ आहे.रविवारपर्यंत पत्र न लिहील्यास गिलानींविरोधात अवमान प्रकरणी आरोप निश्चित के ले जाऊ शकतात.मात्र पक्षप्रमुख आणि राष्ट्रप्रमुखांविरुध्द पत्र लिहीण्याचे आव्हान गिलानींसमोर असून त्यातून ते कसा मार्ग काढतात यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
29 अब्ज 70 कोटी - स्वीस यंत्रणेला कारवाईसाठी पत्र पाठवले तर पाकिस्तानमध्ये सुमारे 29 अब्ज 70 कोटी 29 लाख 59 हजार रुपये परत येऊ शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.