तेहरान - इराणने आण्विक कार्यक्रम सुरुच ठेवण्याचे सुतोवाच केले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रमीन मेहमानपरस्त यांनी हा इराणचा अधिकार असून त्यावर कोणतीच चर्चा करणार नसल्याचे म्हटले आहे.
मेहमानपरस्त म्हणाले, आण्विक कार्यक्रम करणे हा आमचा अधिकार आहे. मात्र यामुळे पश्चिमी आशियात निर्माण होणा-या संकटांवर चर्चा करण्यास इराण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, इराण आणि संयुक्त राष्ट्राचे पाच सदस्य तसेच जर्मनी सोबतच्या चर्चेत, शांतता पूर्ण आण्विक कार्यक्रम हाच आमचा चर्चेचा मुख्य मुद्द असणार आहे. देशाच्या विकास कार्यक्रमांसाठी आण्विक शक्तिचा उपयोग करणे हा आमचा अधिकार आहे. शांततापूर्णरित्या सुरु असलेल्या या आमच्या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्रानेही मान्यता दिली पाहिजे.
हा आमचा अधिकार असल्यामुळे, तो थांबविण्याबाबतची कोणतीही चर्चा करण्यास आम्ही तयार नाही.
इराणच्या आण्विक कार्यक्रमा मागे अण्वस्त्र विकसीत करण्याचा आरोप पश्चिमी देशांनी केला आहे. तर इराणने हे खोटे असल्याचे सांगत, आमचा उद्देश केवळ देशांतर्गत ऊर्जेचा प्रश्न सोडविणे हा आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट संघाचे एक पथक इराणच्या आण्विक कार्यक्रमांची पाहाणी करण्यासाठी गेलेले असतांना, इराणने त्यांना परवानगी नाकारली होती.
अनेक देशांनी इराणवर त्यांच्या आण्विक कार्यक्रमांचा विरोध करतांना त्यांच्यावर आर्थीक आणि व्यापारी बंदी लादली आहे. मात्र तरीही ते आपल्या निर्णयापासून तसूभरही मागे हटलेले नाही.