तेहराण - इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएईए) निरीक्षकांना एका महत्त्वाच्या लष्करी तळावर भेट देण्याची परवानगी नाकारल्यानंतर हे पथक हात हलवत व्हिएन्नाला परतल्यामुळे इराण आणि पाश्चिमात्य देशांतील संघर्ष भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने कितीही दबाव आणला तरी इराणचा अणुकार्यक्रम सातत्याने आणि गांभीर्याने सुरूच राहील, असे इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांनी जाहीर केले आहे. त्यांची ही घोषणा अमेरिकेसह पाश्चिमात्य राष्ट्रांना चिथावणी वाटू शकते. इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचा या देशांचा आरोप आहे.
आयएईएच्या निरीक्षकांनी अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर इराणशी सखोल चर्चा केली; मात्र अणुकार्यक्रम सुरू असलेल्या संशयित ठिकाणांची तपासणी करण्याबाबत उभयतांमध्ये एकमत होऊ शकले नाही. इराणच्या अणुकार्यक्रमाचा लष्करी हेतू आहे काय, याची या निरीक्षकांना तपासणी करायची होती. तब्बल दोन दिवस चाललेल्या चर्चेनंतरही इराणशी कोणताही समझोता न करताच निरीक्षकांच्या पथकाला रिकामेच परतावे लागले आहे. अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर पाश्चिमात्य देशांशी तडजोड करण्याच्या मानसिकतेत सध्या तरी इराण दिसत नाही. पाश्चात्त्य राष्ट्रांनी लादलेल्या निर्बंधांना उत्तर म्हणून इराणने काही युरोपीय राष्ट्रांचा तेल पुरवठा थांबवला आहे. खामेनी हे पाश्चात्त्य देशांचे कट्टर शत्रू मानले जातात.
परचीन तळावरून वाद - आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या निरीक्षकांना मुख्यत्वे परचीन येथील लष्करी तळाला भेट देऊन पाहणी करायची होती. मात्र, इराणने त्यांना परवानगी दिली नाही. याच ठिकाणी इराण अणुबॉम्ब तयार करीत असल्याचा संशय आहे.
अडथळे झेलण्याची तयारी - कोणी कितीही अपप्रचार केला तरी अल्लाहच्या कृपेने इराणचा अणुकार्यक्रम सुरू राहील. दबाव, निर्बंध आणि हल्ले यापैकी काहीही झाले तरी त्याचा उपयोग नाही. कोणतेही अडथळे इराणचा अणुकार्यक्रम थांबवू शकणार नाहीत. - अयातुल्ला खामेनी