बीजिंग - कोंबडी अंडे देते हे सर्वांना माहीत आहे. परंतु चीनमध्ये चक्क एका कोंबड्याने अंडे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्य चीनमधील चिमियाओ गावात घडलेल्या या प्रकाराची वैज्ञानिक व कृषी मंत्रालयाने दखल घेतली असून शास्त्रज्ञांना त्या कोंबड्याचा अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.
चिमियाओ गावातील हुआंग ली या शेतक-याच्या फार्महाऊसवर काही कोंबड्या होत्या. त्यात त्यांनी एक कोंबडाही ठेवला होता. हुआंग परिवारातील सदस्य त्यांच्या गरजेप्रमाणे कोंबड्या फस्त करत होते. अखेरीस हा कोंबडा बचावला होता. एके दिवशी त्या कोंबड्याजवळ एक अंडे दिसून आले. सुरुवातीला त्यांना वाटले की हे अंडे कुणी तरी ठेवले असेल. परंतु दुस-या दिवशीही त्या कोंबड्याजवळ आणखी एक अंडे आढळून आले. हुआंग व त्याचे कुटुंबीय हैराण झाले. कोंबड्याने अंडे देण्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरूच असून माध्यमांनीही त्याची दखल घेतली आहे. सरकारच्या वैज्ञानिक, कृषी मंत्रालयाने शास्त्रज्ञांना या कोंबड्याचा अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.