लाहोर: पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे उजेडात आले आहे. दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिझ मोहंमद सईद या कार्यक्रमात भारतविरोधात विखारी भाषण देत होता.
‘नझरिया-ए-पाकिस्तान’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. या कार्यक्रमात कुरेशी यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सईद हा प्रमुख पाहुणा होता. हा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता, असे ‘द नेशन’ या वृत्तपत्राच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक धोरणाची गरज असल्याचे प्रतिपादन सईदने केले.
पाकिस्तानने भारताला एमएफएन असे स्थान दिले आहे, परंतु या आक्षेपार्ह निर्णयावर कोणताही राजकीय पक्ष समोर आला नाही यावर सईदने नाराजी व्यक्त केली. सरकारने तत्काळ नि:पक्ष निवडणूक आयोगाची स्थापना केली पाहिजे. असा आयोग स्थापन झाल्यानंतरच देशात खरे प्रतिनिधी निवडून येऊ शकतील. सरकारकडून तातडीने काही निर्णय घेण्यात आला नाही तर रक्तपात करण्याचा इशारा कुरेशी यांनी दिला. कुरेशी हे सध्या तेहरीक-ए-इन्साफचे उपाध्यक्ष आहेत.