बंडखोरांविरुद्ध सिरियात आता हेलिकॉप्टरने हल्ले
दमास्कस - सिरियात बशर अल असाद यांच्या सरकारची दमनशाही सुरूच असून रविवारी राजधानीत बंडखोरांविरूद्ध हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. हेलिकॉप्टरमधून राजधानीसह अलेप्पो शहरातील बंडखोरांवर हल्ले करण्यात आले. ही हवाई मोहिम राष्ट्राध्यक्षांच्या बंधूंनी सुरू केली आहे.
महेर अल असाद असे राष्ट्राध्यक्षांच्या भावाचे नाव आहे. तो हवाई दलातील चौथ्या तुकडीचे नेतृत्व करतो. बारझेह जिल्ह्यातील एका मोठय़ा नागरी वस्तीवर हेलिकॉप्टरने हल्ले करण्यात आले, असा आरोप सिरियातील घडामोडींवर बारकाईने लक्ष देणार्या मानवी हक्क संस्थेने केला आहे.
ब्रिटनमधील या संस्थेने आतापर्यंतच्या हिंसाचारात 19 हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. सोळा महिन्यात असाद यांच्या दमनशाहीचे ते बळी ठरल्याची टीका संस्थेने केली आहे. बंडखोरांना लष्कर दहशतवादी म्हणून संबोधते, असेही या संस्थेचे म्हणणे आहे. सरकारी टीव्हीवरील फुटेजमध्ये बंडखोरांचे मृतदेह काही भागातून नेण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.





