Home » International » Pakistan » Yusuf Raza Gilani Issue In Pakistan

गिलानी प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात चकमक

वृत्तसंस्था | Jun 15, 2012, 02:58AM IST
गिलानी प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात चकमक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी प्रचंड शाब्दिक चकमक उडाली. मुख्य न्यायमूर्ती आणि अँटर्नी जनरल एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले. त्यांच्यामध्ये पेटलेले हे शाब्दिक युद्ध थांबण्याची लक्षणे दिसत नसल्यामुळे अनेक वकील कक्षामध्ये शिरले. परिस्थिती शांत करण्यासाठी अखेर सुरक्षा रक्षकांना बोलवावे लागले.

गिलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी गिलानी यांचे सदस्यत्व रद्द करण्यास नकार दिला होता. त्यांच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावणी सुरू असताना मुख्य न्यायमूर्ती इफ्तिखार चौधरी आणि अँटर्नी जनरल इरफान कादीर यांच्यात ही शाब्दिक बाचाबाची झाली. ही सुनावणी करणार्‍या चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठावरच अविश्वास व्यक्त केला आणि मुख्य न्यायमूर्तींनी या प्रकरणाची सुनावणी करू नये, असे म्हटले. त्यावर हे प्रकरण मांडण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे, असे चौधरी म्हणाले.

तुम्हाला त्याची काय घाई पडली, असा प्रतिप्रश्न कादीर यांनी केला. चौधरी हे बोलत असताना कादीर वारंवार त्यांच्या बोलण्यात अडथळे आणत होते. खंडपीठाने त्यांना अडथळे न आणण्याचे बजावूनही कादीर थांबले नाही. दोघांमधील हा वादविवाद ऐकून वकिलांचा एक गट न्यायालयात आला. त्यांच्यात आणि कादीर यांच्यातही बाचाबाची सुरू झाली. प्रकरण एवढे चिघळले की सुरक्षा रक्षकांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

Email Print
0
Comment