अवघ्या महाराष्ट्रात पुलंना ओळखत नाही असा शोधून सापडणार नाही. पुलंना ओळखणा-या लाखो लोकांची मोजदाद त्यांच्या फॅन क्लबमध्ये करता येऊ शकते. पुलंनी अनेक वल्लींचे राहणीमान अजरामर केले असले तरी कुठेही स्वत:बद्दल फारसे काही लिहून ठेवले नाही. पुलंचे संपूर्ण आयुष्य अधिकतर ‘सार्वजनिक’ स्वरूपाचे होते. सुनीताबाई आणि भाई यांच्या सुखी संसारातल्या अडीअडचणी कधीच समोर आल्या नाहीत. त्यामुळे व्यक्तिगत आयुष्यात पुल कसे होते हे त्यांच्या नातेवाइकांकडून ‘सांगोवांगी’ पद्धतीनेच समजते.
सगळ्यांना खळखळून हसवणाºया बहुरंगी आणि बहुढंगी पुलंवर चित्रपट करायचा म्हणजे खरं तर तारेवरची कसरत होती. ‘गोळाबेरीज’ या क्षितिज झारापकरांच्या चित्रपटाच्या निमित्ताने पुलंच्या लेखनबाह्य आयुष्यातील काही गमतीजमती कळतील अशी अपेक्षा होती, मात्र ‘व्यक्ती आणि वल्ली’ तसेच पुलंच्या इतर साहित्यातील छोटे छोटे प्रसंग पडद्यावर दिसल्याने प्रेक्षकांना फार काही गवसल्याचे जाणवले नाही. पुलंनी स्वत: लिहिलेल्या व्यक्तिरेखा हुबेहूब कथाकथनात आणि एकपात्री प्रयोगात साकारलेल्या आजवरच्या पिढीने पाहिल्या. अभिनय, पात्रांनुसार आवाज बदलण्याचे कसब, संगीताची जाण आणि प्रेक्षकांना कथेत खिळवून ठेवणाºया पुलंच्या कथाकथनाच्या सीडीज आजही बाजारात उपलब्ध आहेत. तेव्हा पुन्हा तेच चित्रपटात पाहण्यात काय हशील, असे बºयाचशा प्रेक्षकांचे म्हणणे आहे. या सीडीच्या मदतीमुळे क्षितिज झारापकर यांना चित्रपटात दिग्दर्शनासाठी फारसे कष्ट घ्यावे लागले नसल्याचे जाणवते (ते घेण्याचे कष्टही त्यांनी घेतले नसावेत.)चित्रपटात एकामागून एक व्यक्तिरेखा कोणत्याही संदर्भाशिवाय येत राहतात. पुलंच्या दोन कथांच्या घटनांना जोडणारा दुवा पटकथेत येत नसल्याने पाहताना त्रेधातिरपीट होते. प्रेक्षक एका कथेत रमतोय असे वाटत असतानाच अचानक ती कथा संपते आणि दुसरीच सुरू होते. अंतू बर्वा, रावसाहेब, पेस्तन काका, चितळे मास्तर, नारायण, सखाराम गटणे या व्यक्तिरेखा वाचतानाही समोर उभ्या ठाकतात, इतकी ताकद पुलंच्या लिखाणात आहे. तेव्हा त्याच व्यक्तिरेखा पुन्हा पडद्यावर पाहिल्याने फार अचंबा वगैरे वाटत नाही. या चित्रपटातले सरप्राइज पॅकेज म्हणजे शरद पोंक्षे यांनी वठवलेला नाम्या परीट हा धोबी. चित्रपटाचे संकलन नवशिक्याने केल्याप्रमाणे अगदीच फसले आहे. पुलंच्या आईची भूमिका करणाºया मृण्मयी देशपांडेचे संवाद आणि तिच्या ओठांची हालचाल चित्रपटाच्या सुरुवातीपासून अगदी संपेपर्यंत पाठशिवणीचा खेळ खेळत असते. पडद्यावर ओठांची हालचाल प्रमाण मराठीत आणि ऐकू येणारे संवाद कोकणी भाषेत, असा काहीसा सावळागोंधळ दिग्दर्शक म्हणून क्षितिजच्या लक्षात कसा आला नाही याचे आश्चर्य वाटते. या चित्रपटाचा एक्स फॅक्टर म्हणजे लाडक्या पुलंची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता निखिल रत्नपारखी. व्यक्तिरेखांना केवळ रिअॅक्ट होणारा निखिल अभिनयातले ‘रत्न’ आहे हे एव्हाना सगळ्यांनाच जाणवले आहे.
पुलंनी महाराष्ट्रावर केलेले प्रेम लक्षात घेता केवळ पुलंवरच्या प्रेमापोटी समस्त मराठी भाषिक हा चित्रपट पाहतील यात शंकाच नाही. मात्र चित्रपट नाही तर पुलंवर तयार केलेली डॉक्युमेंटरी पाहिल्याचे समाधान वाटेल, हेही तितकेच खरे.
bhingarde.namrata@gmail.com