असा करा प्रतिबंध

गुदभागातील आजार - मूळव्याध (पाइल्स), भगंदर (फिशुला), विद्रधी (अॅबसेस), चिरा (फिशर), पॅपिलोमा अॅनालवर्ट, खाज (प्रुरिट्स अॅनी), ईशेओरेक्चल अॅबसेस, पॉलिप्स, कॅन्सर (अल्सरटेड कॅन्सर) इत्यादी.
मूळ्व्याधीची अनेक नावे : शत्रूप्रमाणे प्राणाचा नाश करणारा म्हणून यास आयुर्वेदात अर्श म्हटले आहे. गुदाच्या मार्गाचा अवरोध करून मांसाचे अंकुर मनुष्यास शत्रूप्रमाणे टोचतात म्हणून यास अर्श म्हणतात. शरीराचा मूळ भाग गुद हा आहे म्हणून मूळव्याध असे म्हणतात.
पाइल्स म्हणजे चेंडूसारखा मांसल भाग म्हणून यास लॅटिन भाषेत पाइल्स (पिला-बॉल्स) म्हणतात.
हिमोरॉइड्स म्हणजेच हर्म रॉइड्स म्हणजे रक्त वाहणे. रक्तस्राव वाहून नेणारी रक्तवाहिनी ही रक्तवाहिनी फुगलेली असते. त्यातून रक्तस्राव होत असतो. म्हणून यास हिमोरॉइड्स म्हणतात. गुजराती आणि हिंदी भाषेत मूळव्याधीस बवासीर असे म्हणतात.
मूळव्याध होण्याची कारणे : मलप्रवृत्तीला साफ न होणे, सतत जुलाब होणे, मलनिष्क्रमणाच्या वेळेस कुंथणे, भूक नसताना जेवणे, अतितिखट, अतिआंबट यासारख्या पदार्थांचे सेवन करणे, अत्यंत थंड पाणी पिणे, जेवण झाल्यावर पुन्हा जेवणे, सतत बैठे काम करणे, हृदयरोगाचे आॅपरेशन झाल्यानंतर चालू असलेल्या औषधांमुळे होणारा दुष्परिणाम म्हणून दिवसा झोपणे, रात्री जागरण करणे आणि स्त्रियांमध्ये गर्भपात झाल्यावर किंवा गर्भिणी अवस्थेत गर्भाचा दाब मलाशयावर पडल्यास मूळव्याध उत्पन्न होतो. या सर्व कारणांबरोबर आनुवंशिक हेसुद्धा महत्त्वाचे कारण होय.
मूळव्याध होण्यापूर्वीची लक्षणे : अन्नाचे पचन न होणे, पोटात गुडगुड असा आवाज येणे, जेवण न करता ढेकर येणे, अतिप्रमाणात झोप येणे, हातपाय गळून गेल्याप्रमाणे वाटणे, गुदभागी टोचल्याप्रमाणे किंवा कापल्याप्रमाणे वाटणे.
मूळव्याध झाल्यानंतरची लक्षणे : गुदभागी वेगवेगळ्या आकाराचे कोंब उत्पन्न होणे, टोचल्याप्रमाणे वेदना, सांध्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे वेदना होतात त्याप्रमाणे गुदभागी वेदना होणे.
मूळव्याधी चिकित्सा : चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांनी औषधी चिकित्सा, शस्त्रकर्म चिकित्सा, क्षारकर्म चिकित्सा, अग्निकर्म चिकित्सा या चार चिकित्सा सांगितलेल्या आहेत.
शस्त्रकर्म चिकित्सा : यात रुग्णाला भूल देऊन गुदभागाचे विस्तारण व मूळव्याधाचे छेदन करून मूळव्याध काढून टाकणे यास हिमोरॉइड्ेक्टॉमी म्हणतात.
सध्याच्या परिस्थितीत रेडिओ फ्रिक्वेन्सी क्युटरी, थर्मल क्युटरी, लेसर क्युटरी, क्रायोसर्जरी, रबरबँड, इंजेक्शन, स्टॅपलर, डीजीएचएएल यासारख्या पद्धती आहेत, परंतु सर्व चिकित्सा पद्धतींचा विचार केला असता जुनं ते सोनं आणि आजही अपडेट असे क्षारसूत्र हे आहे.
क्षारसूत्र चिकित्सा : वैद्याला क्षारसूत्र तयार करण्यास खूप कष्ट लागतात. हे क्षारसूत्र 21 दिवसानंतर पीएच व्हॅल्यू मेंटेन करून वापरता येते. या पद्धतीत कोणत्याही प्रकारे रुग्णाला वेदना होऊ नये म्हणून संमोहन (भूल) दिले जाते. दुस-या दिवसापासून रुग्ण नेहमीची कामे करू शकतो. इतर चिकित्सेच्या मानाने स्वस्तामध्ये होणारी चिकित्सा आहे. मलप्रवृत्तीच्या वेळी रक्त येणे, गुदभागी आग उत्पन्न होणे, गुदभागी खाज येणे या लक्षणाबरोबर भगंदर - संडासच्या जागी पुळी येते. फिशर -चिरा पडणे.
मूळव्याधीचे प्रकार
बाह्यअर्श (एक्सटर्नल पाइल्स), अभ्यांतर अर्श (इंटरनल पाइल्स) या प्रकाराबरोबरच मूळव्याधीच्या चार अवस्था असतात.
फर्स्ट डिग्री पाइल्स : यात मलविसर्जनानंतर रक्तस्राव होतो ही मूळव्याधीची प्रथमावस्था आहे.
सेकंड डिग्री पाइल्स : यात मूळव्याधाचा मांसलभाग मलप्रवृत्तीच्या वेळी बाहेर पडतो, नंतर त्वरित आपोआप आतमध्ये जातो. यात वेदना हे लक्षण तीव्र असते.
थर्ड डिग्री पाइल्स : या तृतीय अवस्थेत मलप्रवृत्तीच्या वेळेस मूळव्याध बाहेर येताच रक्तस्राव होतो. शौचानंतर मूळव्याध आपोआप गुदभागात जातात.
फोर्थ डिग्री पाइल्स : ही मूळव्याधीची चौथी आणि शेवटची अवस्था आहे. गुदद्वाराच्या बाहेर मूळव्याध आलेले असतात. वेदना, आग होणे, रक्तस्राव, बसता न येणे ही प्रमुख लक्षणे आहेत.
प्रतिबंधात्मक उपाय
शौच्य करतेवेळी कुंथणे टाळावे, पुरेसा आहार घ्यावा, भरपूर द्रवपदार्थ प्यावेत (दररोज किमान 8-10 ग्लास), अतिवजनदार असल्यास त्या व्यक्तीने वजन कमी करावे. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा. नियमितपणे शौचाला होण्यासाठी सवय लावावी. शौच्य मऊ होण्यासाठी स्टूल सॉफ्टनरचा वापर करावा, सतत बसून असण्याच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्यावी, गुदद्वाराचा भाग स्वच्छ ठेवावा. तरी कमी होत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.





