जाहिरात
Home >> Magazine >> Rasik >> Article On Obama Vs Romaoni By Govind Talvalkar

अमेरिकी महालढत : ओबामा विरुद्ध रॉमनी

गोविंद तळवळकर | Apr 29, 2012, 05:41AM IST
 
 


अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाने ओबामा यांच्याविरुद्ध आपला उमेदवार अद्याप अधिकृतपणे जाहीर केला नाही; पण उमेदवारी मिळवण्यासाठी आठ-नऊ उमेदवार होते, ते गळतगळत आता तिघे रिंगणात उरले आहेत. त्यातील मिट रॉमनी हे पक्षाचे उमेदवार होतील याबद्दल आता काही शंका राहिलेली नाही. ते मॅसॅच्युसेट्स या राज्याचे एक काळ गव्हर्नर म्हणून निवडून आले होते.

त्यांच्या पक्षातले त्यांचे दोन प्रतिस्पर्धी म्हणजे न्यूट गिंगरिज आणि रॉन पॉल. गिंगरिज हे काही वर्षे अमेरिकन प्रतिनिधी सभेचे (हाउस  ऑफ रिप्रझेंटेटिव्हज) अध्यक्ष होते व त्या अगोदर ते त्याच सभागृहाचे सदस्य होते. रॉन पॉल हे गेली वीस वर्षे त्याच सभागृहाचे सभासद आहेत. अध्यक्षीय निवडणुकीला उभे राहण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे व पराभव त्यांच्या अंगवळणी पडला आहे.

गिंगरिज हे फर्डे वक्ते आहेत. ते प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष असताना त्यांच्या आततायी धोरणामुळे अमेरिकन सरकारची काही खाती आणि प्रतिनिधी सभा बंद पाडली याचा त्यांना विसर पडला असला तरी अमेरिकी जनतेला तो पडलेला नाही. आता अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी झालेल्या स्पर्धेत त्यांनी भरमसाट आश्वासने देण्याचा उच्चांक गाठला. 20 वर्षांत चंद्रावर वसाहत आणि अडीच डॉलरला गॅलन पेट्रोल हे वानगीदाखल दोन.

पॉल व गिंगरिज यांना उमेदवारी मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. म्हणून रॉमनी यांचा मार्ग मोकळा आहे. त्यांना शह दिला होता तो रिक सँटोरम यांनी. ते अमेरिकन सिनेटचे सभासद होते; पण नंतर ते पराभूत झाले. ते अत्यंत कट्टर प्रतिगामी विचारांचे आहेत. कुटुंब नियोजनास विरोध; आधुनिक शिक्षण पद्धतीचा विद्वेष; आर्थिक बाबतीतही याच प्रकारचे विचार. आधुनिक शिक्षणच व्यर्थ असल्यामुळे सँटोरम यांना विद्यापीठ व महाविद्यालयेच नको आहेत.

त्यांना या वेळी काही राज्यांत रिपब्लिकन पक्षीयांनी पाठिंबा दिला. त्या पक्षात गेल्या काही वर्षांत व त्यातही गेल्या तीन वर्षांत कट्टर प्रतिगामी प्रवृत्ती वाढल्या आहेत. त्यांनी या पक्षावर दबाव आणण्याची संघटित मोहीम काढली असून ‘टी पार्टी’ या नावाने त्यांचा गट ओळखला जातो. अमेरिका स्वतंत्र होण्यापूर्र्वी ब्रिटिश सरकारच्या आयात जकातीविरुद्ध लोकांनी उठाव करून ब्रिटनहून येणारे चहाचे पेटारे समुद्रात फेकण्याचे तंत्र अवलंबिले. त्यावरून ‘टी पार्टी’ हे नाव घेण्यात आले.

तथापि, ब्रिटिश सत्ता ही परकी होती; पण नंतर अमेरिकन लोकांनी निवडून दिलेल्या लोकांतूनच सरकार स्थापन होत असते. पण आपल्याकडे दुस-या स्वातंत्र्याच्या घोषणा करणारे जसे भंपक आणि कमालीचे उथळ लोक आहेत, तसे अमेरिकेतही आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्ष मात्र प्रतिगामी आणि धर्माचा पगडा वाढवणारा बनवला आहे.

रॉमनी यांच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा त्यांचाच आहे. यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी झालेल्या स्पर्धेत रॉमनी यांना आर्थिक, सामाजिक व परराष्ट्र ीय राजकारण यांच्या बाबतीत अतिरेकी व अव्यवहार्य धोरणे जाहीर करावी लागली. रॉमन हे आर्थिक क्षेत्रात अत्यंत यशस्वी झाले आहेत. तसेच गव्हर्नर म्हणून काम करताना त्यांना विरोधी पक्षाचे साहाय्य घ्यावे लागले. ते त्यांनी घेतले; पण या टी पार्टीवाल्यांनी त्यांना भलतेच डगले परिधान करायला लावले. रॉमनी यांना ओबामा यांच्याशी स्पर्धा करायची आहे. या दोघांचे उजवे व डावे असे घटक आहेत. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रो-अमेरिकन अध्यक्ष. या समाजाच्या लोकांचे प्रमाण बारा टक्के आहे. ओबामा यांचा हा पक्का पाठीराखा मतदारवर्ग आहे. तसेच मेक्सिको व इतर दक्षिण अमेरिकन देशांतून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेला व लॅटिनो म्हणून ओळखला जाणारा मतदारवर्ग मोठा आहे.

रॉमनी वा इतर कोणी रिपब्लिकन पक्षीय उमेदवार या मतदारांना मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे वळवू शकत नाहीत. त्यातल्या त्यात बुश यांनी मात्र या समाजातून आपल्याकडे ब-यापैकी पाठिंबा मिळवला होता; पण रॉमनी यांना हे जड जाणार आहे. त्यातच आपल्या पक्षातल्या प्रतिगामी स्पर्धकांशी मुकाबला करताना रॉमनींनी केलेली वक्तव्ये त्यांच्या अंगाशी येणारी होती.

एका बाबतीत ओबामा व रॉमनी दोघांची स्थिती बरीचशी सारखी आहे. ती म्हणजे, दोन्ही पक्षांना न बांधलेल्या व अपक्ष म्हणून ओळखल्या जात असलेल्या वर्गाची मते. आपण पक्षाची बंधने न मानता कारभार करू, असे ओबामा यांनी आश्वासन दिले होते; पण त्यांनी अनेक वेळा कमालीची पक्षीय भूमिका घेतली; तडजोड होणे शक्य असताना ती झिडकारली,तर आता उमेदवारीच्या स्पर्धेच्या काळात रॉमनींनीही पक्षांधता टोकाला नेली. यामुळे ज्या अपक्षीय मतदारांवर भिस्त असते, ते ओबामा व रॉमनी यांच्यावर खुश नाही.

आंतरराष्ट्र ीय राजकारण, विशेषत: दहशतवादविरोधी कारवाई या बाबतीत ओबामा यांनी खंबीर पावले टाकली. ओसामा बिन लादेन याला संपवल्यामुळे रिपब्लिकन पक्षीयांच्या टीकेचा कणाच मोडला. तो पक्ष आतापर्यंत असे मानत आला की, राष्ट्र ीय संरक्षणाच्या बाबतीत डेमॉक्रॅटिक पक्ष भरवशाचा नसून केवळ आपलाच पक्ष देश समर्थ ठेवू शकतो; पण ओबामा यांनी ते खोटे ठरवले. नुसता ओसामाच नव्हे, तर गद्दाफीही त्यांच्याच कारकीर्दीत संपला.

तसे पाहिले तर अमेरिकेसह सर्व देशांना आर्थिक झळ लागली असताना रशिया, चीन व काही लॅटिन अमेरिकन देश; काही मध्यपूर्वेतील देश यांच्याशी ताठ्याने वागण्याची रिपब्लिकन पक्षीयांची भाषा हास्यास्पद आहे आणि ओबामा यांनी वास्तवाची जाण ठेवली आहे. रॉमनी मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी वास्तवाशी फारकत झाल्यासारखे बोलत होते.

तथापि, आजच्या आर्थिक समस्या रॉमनी चांगल्या जाणतात आणि त्यावर उपायही करू शकतात. ते त्याच क्षेत्रात वाढले आहेत. याही बाबतीतील त्यांचे प्रसिद्ध झालेले काही विचार अवास्तव आहेत; पण अधिकार मिळाल्यावर ते बदलू शकतात. ओबामा यांना अत्यंत बिकट आर्थिक स्थितीला तोंड द्यावे लागले; पण त्यांनी आपल्या पक्षातल्या व आपल्याला पाठिंबा   देणा-यांपैकी काहींच्या अव्यवहार्य भूमिका स्वीकारून अर्थव्यवहार ख-या अर्थाने प्रगतिपथावर नेला नाही. अमेरिकेची आर्थिक स्थिती थोडी सुधारत असताना ती घसरण्याचेही इशारे मिळत आहेत. स्पेन व इटली यांचा भरवसा नाही. पेट्रोलचे भाव चांगलेच वाढले आहेत. इतकेच नव्हे, एकंदरच भाववाढ झाली आहे. सर्वात जाचक आहे ती बेकारी. गेले काही महिने ती सुधारली आहे; पण ही गती अधिक मंदावण्याचा संभव जाणते व्यक्त करतात. तसे झाले व भाववाढ रोखली गेली नाही तर ओबामा यांना अध्यक्षीय निवडणूक अवघड जाईल आणि रॉमनी यांचे पारडे वर जाईल. रॉमनी यांच्यापुढे अडचण आहे ती म्हणजे व्यक्तित्वाची. ते देखणे आहेत; पण सर्वसामान्य लोकांत मिळून मिसळून राहण्याची व बोलण्याची त्यांची वृत्ती नाही. त्यांना हलके-फुलकेही बोलता येत नाही. त्यांची हयात जरी उद्योग, व्यापार यात गेली असली तरी निवडणुकीच्या प्रचारसभांत केवळ आर्थिक प्रश्नांवरच बोलून चालत नाही. समाजापुढे इतर अनेक प्रश्न आहेत. तेही फक्त आर्थिक दृष्टीनेच विचारात घेऊन चालत नाहीत.

ओबामा यांच्यासंबंधी लोकांना असे दूरत्व वाटत नाही; पण आपल्याला सर्व समजले असून आपण भाषण केले की प्रश्न संपला, असा जो त्यांचा आव असतो तो पोकळ आहे, हे नाकारता येणार नाही. अशा या दोघांत लढत होणार असून नोव्हेंबरच्या प्रारंभी निर्णय होईल.

govindtalwalkar@hotmail.com

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
10 + 7

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment