जाहिरात
Home » Magazine » Madhurima » Child Birds Fly

पिलांची भरारी

अरूणा बुरटे | Feb 22, 2013, 07:53AM IST
पिलांची भरारी

 ऑगस्ट सरून पावसाळ्याला थोडीशी उघडीप मिळाली होती. कोजागिरीच्या खोलीतील खिडकीवर वळचणीत एक चिमणा-चिमणी सारखे काड्या आणून कचरा करीत होते. कचरा झाला तरी काही बिघडत नव्हते. चिमणा-चिमणीला घरटे करता येण्यासारखी जागा सापडत नव्हती. कोजागिरी अस्वस्थ होती. चिमणा-चिमणी सारखे आपल्याच खिडकीत बसून राहावेत असे तिला वाटायचे. चुकूनही काही कामासाठी आई किंवा इतर कोणीही त्या खोलीत आले तरी कोजागिरी नाराजी दाखवायला लागली. कारण आवाजाने ते चिमणा-चिमणी उडून जायचे. असे दोन दिवस चालले. कोजागिरीला वाटायचे, कोणीही घरात आवाजच करू नये. म्हणजे चिमणा-चिमणी नक्की घरटे करतील. शांताने पाहिले. नीट जागा शोधली नसल्याने घरटे बनत नव्हते. त्यांनी ठेवलेली प्रत्येक काडी दुसरी काडी आणून ठेवल्यावर पडत होती. गेले दोन दिवस संध्याकाळपर्यंत ती हा एवढा ढिगारा उचलून टाकत होती. त्या खिडकीशी अजिबात जायचे नाही. त्या खोलीत पाऊलसुद्धा वाजवायचे नाही हे एक-दोन दिवस ठीक होते. पण असे किती दिवस चालणार? चिमणा-चिमणी दोघेही चिकट होते.

थोडेसे काय, चांगलेच वेडे होते. दोन दिवसांच्या अनुभवाने ही जागा बरोबर नाही हे त्यांना कळायला हरकत नव्हती. चिमणा-चिमणी आणि  कोजागिरी दोघांनाही कळत नव्हते. शांतालाच काहीतरी करणे भाग होते. शांताने जुना पुठ्ठ्याचा खोका घेतला.  चिमणी आत जाऊ शकेल असे गोल दार कापले. दारापाशी चिमण्यांना बसता यावे म्हणून आडवा पुठ्ठा बसवला. घराला हिरवा कागद डकवला.  नवीन घर खिडकीच्या दाराला बांधले. थोड्याच वेळात चिमणी दबकत दबकत त्या गोल दाराच्या पुठ्ठ्यावर जाऊन बसली. मग चिमणाही खोक्यावर बसून वाकून पाहू लागला. दोन-तीन वेळा अशी पाहणी केल्यावर चिमणीने हळूच गोल दारातून खोक्याच्या घरात प्रवेश केला. आत जाऊन चोचीने सर्व जागा चाचपली. बाहेर येऊन चिमण्यालाही आत जाऊन बघ अशी सूचना देऊन गवत आणायला निघून गेली. काड्यांची जमवाजमव जोरात सुरू झाली.

घरात बाळासाठी छान मऊ उबदार गादी तयार होत होती. कोजागिरीला रोज सकाळी जाग या तिच्या नवीन मित्र-मैत्रिणींच्या चिवचिवाटाने यायला लागली. हे एवढे आकर्षक खेळणे असताना शाळेत जायला कोजागिरी तयार नसायची. होता होता घरटे तयार झाले. चिमणीने अंडी दिली आहेत व काही दिवसांतच त्यातून छोटी छोटी पिले बाहेर येतील हे सर्व काजगिरीला आईकडून कळले होते. एक दिवस अचानक बारीक चूं चूं  असा आवाज यायला लागला. चिमणा-चिमणी आता गवताच्या ऐवजी चोचीत आळ्या आणायला लागले. तोच पिलांचा खाऊ होता. आईबाबा आले की पिले फक्त चोची बाहेर काढीत. बाजूला उभे राहून कोजागिरीला हे सर्व पाहता येत होते. आज पिलांनी किती वेळा मंमं केलं याची मोजणी व्हायची. त्याचं मोजमाप करणं फारच जिकिरीचं आहे हे कोजागिरीला समजले. कारण मिनिटा-मिनिटाला पिले चोची आ ऽ ऽ करायची. काही अंक मोजल्यावर कोजागिरीने तो नाद सोडला होता. मात्र काड्या गोळा करणे, मग काड्या गोळा करण्याचे थांबवणे, चूं चूं असा आवाज येणे या सर्व दिवसांचा हिशेब तिने एका वहीत आईच्या मदतीने लिहून ठेवला होता.

आता पिले चांगलीच मोठी झाली होती. एकूण तिघे होते. त्यांना हळूहळू गोल दारातून बाहेर उडी मारता येत होती. आता काही दिवसांत ती उडून जाणार हे आईबाबाला माहीत होतं. कोजागिरीला वाटायचे इतके सुंदर घर सोडून हे सर्व मुळीच जाणार नाहीत. शिवाय कोजागिरीची आणि त्या सर्वांची छान मैत्री झाली होती. पिले उडून जाणार हे सत्य होते. कोजागिरीची समजूत काढणे शक्य नाही हेही बाबाला माहीत होते. कॅमे-यात नवीन रोल घालून या चिमणा-चिमणी व त्यांच्या पिलांचे फोटो काढले. काही फोटोत कोजागिरीसकट ते येतील असाही प्रयत्न केला.  अचानक एके दिवशी खूपच चिवचिवाट ऐकू येऊ लागला. कोजागिरी थोडीशी भांबावली. सर्व पिलांची जणू मला उडायला येते अशी शर्यत लागली होती. एक एक करून सर्व पिले उडून गेली. प्रत्येक पिलाचे उडण्याचे प्रयत्न कोजागिरीने खूप जवळून पाहिले. त्यांची भरारी पाहताना कोजागिरी आश्चर्यचकित झाली होती. पण नंतर तिला खूप एकाकी वाटले. तिच्या खिडकीजवळचे ते घरटे अबोल झाले. चिमण्यांचे गाणे बंद पडले. चिमणीच्या वहीत बाबांनी काढलेले फोटो चिकटवून ती वही कोजागिरी सारखी आपल्या उशाशी ठेवू लागली. उडणा-या पिलांची भरारी, त्यांचे पंख तिच्या नजरेसमोर यायचे. आपल्याला त्यांच्यासारखे उडता आले तर... असे तिला वाटायचे!

aruna.burte@gmail.com

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
8 + 2

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment