जाहिरात
 
 
 

एक प्रयास...

 
Source: प्रणव सखदेव   |   Last Updated 05:53(22/02/12)
 
 
 

आज ज्या व्यक्तीबद्दल लिहिणार आहे ती खरं तर आपल्यातून गेली आहे. पण तिने केलेलं काम मात्र ‘मरणारं’ नाही तर आपल्याला ‘वाचवणारं’ आहे. तिची कारकीर्द आपल्या सगळ्यांना प्रेरणादायक तर आहेच, पण त्याशिवाय ती प्रबोधन करणारी आहे. ही व्यक्ती हयात असती तर पुढची काही वर्षं तिने आपल्यासाठी आपल्याही नकळत अनेक कामं करून ठेवली असती... या व्यक्तीचं नाव आहे गिरीश संत.

ऊर्जा क्षेत्रामधले आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शास्त्रज्ञ म्हणून ख्याती असलेले संत यांचे नुकतेच दिल्ली येथे अचानक निधन झाले. संत हे ओळखले जातात ते पारदर्शक ऊर्जा धोरण राबवण्यासाठी कार्यरत असणारे लोकाभिमुख शास्त्रज्ञ म्हणून. पुण्यात बरेच जण त्यांना बंड्या या नावाने ओळखायचे. महाराष्ट्रातला वीज क्षेत्रातला अंधार दूर करण्यासाठी संत आणि प्रयास ही संस्था गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ कार्यरत होते.

संत यांचा जन्म झाला ग्वाल्हेर येथे. त्यांनी मुंबई आयआयटीमधून एमटेक केले. त्यांचा अभ्यासाचा विषय एनर्जी सिस्टिम्स होता. पुण्यात त्यांना काही वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मुळात कार्यकर्त्याचा पिंड असल्याने ते नोकरीत रमणं शक्यच नव्हतं. त्यांनी लगेचच ऊर्जा प्रश्नावर स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली. 1994 मध्ये ऊर्जेच्या अभ्यासासाठी त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने प्रयास या संस्थेची स्थापना केली. त्याच सुमारास एन्रॉन हा वादग्रस्त प्रकल्प चांगलाच गाजत होता. वीज मंडळ आणि एन्रॉन यांच्यातील व्यवहारासंदर्भात प्रश्न उभे करून, लढा उभारण्यात संत यांचे मोठे योगदान आहे. त्यानंतर वीज नियामक आयोगासमोर लोकांच्या वतीने संत व त्यांच्या सहका-यांनी सातत्याने भूमिका मांडली.

वीजनिर्मिती, वितरण आणि दर या तीन गोष्टींबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे जेव्हा सर्वसामान्य लोकांना शॉक बसू लागला तेव्हा संत पुढे सरसावले. खरं तर हा तसा तांत्रिक विषय. सर्वसामान्यांना पटकन न कळणारा. परंतु संत यांनी अत्यंत सुलभ आणि सोप्या पद्धतीने या विषयाची मांडणी करत लोकांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केली. वीजनिर्मितीची प्रक्रिया, तिची क्षमता वाढवण्यासाठीचे तंत्र, वितरणातील गळती आणि दरनिश्चिती यांबाबत शास्त्रीय पण सोप्या शब्दांत त्यांनी मांडणी केली.

संत यांनी एन्रॉन प्रकल्पातील दोष दाखवून दिले तसेच रिलायन्स, सरदार सरोवर, वीज मंडळाच्या आकारणीचे धोरण यांमधील दोषांवरही त्यांनी नेमके बोट ठेवले. ऊर्जा, प्रामुख्याने वीज हा विकासासाठी महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरांमध्ये सहज उपलब्ध असायला हवा असे त्यांचे म्हणणे होते. संत यांनी केलेल्या कामामुळे ऊर्जा क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईन परंतु सकारात्मक बदल झाले. त्यांनी वीजबचत करणारी उपकरणे आणि अपारंपरिक ऊर्जास्रोत यांचा वापर वाढावा यासाठी आग्रह धरला. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कामाची नोंद घेतली गेली. ते अनेक संस्थांचे सल्लागार होते. विविध   ऊर्जाविषयक समित्यांवर संत यांनी काम केले आहे. वैश्विक तापमानवाढ आणि हवामानबदलाबाबत भारत, ब्राझील, रशिया, चीन आदी देशांच्या गटाचे ते सदस्य होते; तसेच बाराव्या योजनेसाठीही त्यांनी काम केले. संत यांच्या जाण्याने ऊर्जा क्षेत्रातील एक ‘प्रयास’ संपला आहे!

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
3 + 2

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment