केरळमधील कालिकत हे शहर आजही केवळ भारतात नव्हे तर जगात मसाल्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. कालिकत शहरात प्रवेश करताच या शहराची प्रकृती व्यापारीच असल्याचे लक्षात येते. चोहोबाजूंनी व्यापारी पेठा, नवे मॉल, मध्ययुगीन वास्तू आणि पर्यटकांची वर्दळ असा काहीसा माहोल या शहरात दिसतो. पोर्तुगीज, डच, स्पॅनिश, इंग्लिश पर्यटक मसाल्याच्या खरेदीसाठी येतात. अनेक पर्यटक किंवा व्यापारी आजही मध्ययुगीन इतिहासाशी आपले नाते जोडतात. 2011च्या आकडेवारीनुसार भारताकडून मसाल्याच्या पदार्थांची निर्यात सर्वात अधिक अमेरिका, चीन आणि युरोपीय देशांना आजही होते, हे विशेष आहे. पण कालिकत किंवा संपूर्ण मलबार किनारपट्टी संगम काळ (इसवी सन पूर्व तिसरे शतक - इसवी सन तिसरे शतक) ते साधारण 13व्या शतकापर्यंत मसाल्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध नव्हती. मार्का पोलो 13व्या शतकाच्या अखेरीस केरळमध्ये आला होता. पण त्याने मलबारमध्ये मसाल्याचा व्यापार असल्याचे कुठलेही उल्लेख केले नाहीत. पण ही किनारपट्टी मसाल्याच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येण्यामागे युरोपीय देशांच्या वसाहतवादाचा अधिक वाटा आहे.
तेराव्या शतकाच्या अखेरीस युरोपमध्ये रेनेसाँनंतर दर्यावर्दी मोहिमांना बळ मिळाले. 1453 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपलचा पाडाव केल्यानंतर पर्शियन आखातातील व्यापारावर अरब आणि तुर्कांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. तर युरोपमध्ये रेनेसाँमुळे युरोपीय लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. पशूंसाठी वैरणीची कमतरता असल्याने थंडीच्या महिन्यांमध्ये युरोपमध्ये जनावरांच्या कत्तली होत असत आणि त्यांचे मटन अनेक महिने टिकण्यासाठी दालचिनी, लवंग, मिरे यांचा भरपूर वापर केला जात असे. ख्रिश्चन धर्माचा जगभर प्रसार आणि प्रचार होण्यासाठी 1453मध्ये पोपने भारताकडे जाणारा समुद्री मार्ग शोधण्याकरता पोर्तुगीज दर्यावर्दी, खलाशांना विशेष सवलती दिल्या. यातून 1492मध्ये कोलंबस भारताच्या शोधात निघाला, पण त्याला अमेरिकेची भूमी गवसली. 1498मध्ये वास्को-द-गामाने दक्षिण आफ्रिकेच्या केप आॅफ गुड होपला वळसा घालून भारताकडे कूच केले. त्याला भारतापर्यंतचा मार्ग अब्दुल मजिद या गुजराती खलाशाने दाखवला. त्याने तीन बोटींच्या मदतीने कालिकतच्या जमिनीवर पाय ठेवले.
कालिकत किंवा मलबार किनारपट्टीला त्या काळात महत्त्व आले ते केवळ केरळमध्ये उत्पादन होणाºया मसाल्यांच्या पिकांमुळे नव्हे, तर या किनारपट्टीवर ईस्ट इंडीज (इंडोनेशिया, मलाया) बेटांवरून मसाल्याचे पदार्थ आणले जात होते त्यामुळे. तेथून हे पदार्थ पर्शियन आखाताच्या मार्गाने, लाल समुद्राच्या मार्गाने इजिप्त, अरबस्तानात, रोमचे साम्राज्य, युरोपमध्ये जात होते. या काळात खुष्कीच्या मार्गाने परदेशी व्यापार करणारे अनेक मोठे भारतीय व्यापारी कार्यरत होते. येमेनच्या बंदरात करिमी नावाचा व्यापारी संघ थेट चीनशी व्यापार करत होता, तर बर्मीज व्यापा-यांचा स्वत:चा संघ होता. दक्षिण भारतातील व्यापा-यांचा मणिरामन, तामिळ व्यापा-यांचा चेट्टी, तर मलबार किनारपट्टीवरील व्यापा-यांचा मराकारास हा संघ होता. गुजरातमधील वस्तुपाल आणि तेजपाल ही श्रीमंत घराणी व्यापारी होती. हे सर्व व्यापारी संघ किरकोळ आणि ठोक वस्तूंचा व्यापार करणारे होते. यांच्यामध्ये सावकारी, व्याजाने देणारी घराणी, विमा उतरवणारे काही सावकारही होते. या व्यापारांचा युरोपशी संबंध गुजरात आणि मलबार किनारपट्टीहून लालसमुद्रामार्गे येत असे. पोर्तुगीज भारतीय सागरी हद्दीत येण्याअगोदर अनेक शतके भारतीय व्यापा-यांचा पूर्व आफ्रिकेशी व्यापार होत होता, हे लक्षात घेतले पाहिजे. 15व्या शतकात चीनच्या मिंग राजवटीने चिनी व्यापा-यांना दक्षिण आशियाई देशांशी व्यापार करण्यास बंदी घातल्याने भारतीय आणि अरबी व्यापाºयांनी आपला व्यापार अधिक विस्तारला. वास्को-द-गामा जेव्हा कालिकतहून पूर्व आफ्रिकेच्या मालिंदीच्या किनाºयावर थडकला, तेव्हा त्याला तेथे चार-पाच भारतीय बोटी दिसल्या.
हा व्यापार केवळ मसाल्याचा होत नव्हता, तर अनेकविध वस्तंूचा होत असे. युरोपला चीनमधून रेशम, रत्नमाणिक निर्यात होत असे. चीनकडे ईस्ट इंडीज व भारताकडून मसाल्याचे पदार्थ जात. युरोपला भारतीय सागरी मार्गातून मीठ, साखर, नीळ, धान्य, कापड, मसाले, घोडे, रेशीम, चायनीज पोर्सेलीन, सुगंधीद्रव्ये, हस्तीदंत, काच, दागिने यांचा मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. अरबी घोड्यांना भारतामध्ये मोठी मागणी होती. भारतामध्ये मान्सून येण्याच्या अगोदर अरब व्यापाºयांची जहाजे गुजरात वा मलबार किनारपट्टीला लागत. ही जहाजे त्यांचा माल इथे उतरवत आणि भारतीय माल चढवून ती दक्षिण आशियाई आणि चीनकडे रवाना होत. अनेक अरबी आणि भारतीय व्यापाºयांची जहाजे चीनकडे जात असत. पोर्तुगीजांनी फिलिपाइन्समार्गे दक्षिण अमेरिकेत जाण्याचा मार्ग शोधला. त्यानंतर भारतीय कापड थेट दक्षिण अमेरिकेत जाऊ लागले. या व्यापाºयांत भारतीय जहाजांचाही समावेश होता.
भारतीय जहाजांची खासियत अशी होती की ही जहाजे बांधताना शिवणकामाचा अधिक वापर केला जात असे. त्याचे कारण असे की उथळ समुद्रात, विशेषत: पर्शियन आखातात जाताना ही जहाजे समुद्रातील वेगवान प्रवाहांचा सामना करू शकत होती. 15व्या शतकात खिळ्यांच्या साहाय्याने जहाजबांधणी केली जाऊ लागली. पण जहाजाच्या दुरुस्तीवेळी अनेक अडचणी येत होत्या. अशा वेळी भारतीय जहाजबांधणीचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरे.
हे सगळे चित्र बघता लक्षात येते की आशियाई व्यापा-यांचा कारभार युरोपीय व्यापा-यांपेक्षा कित्येक पट मोठा आणि सुदूर पसरला होता. पण या व्यापाºयांना युरोपीय व्यापाºयांसारखे राजकीय किंवा लष्करी संरक्षण नव्हते. पोर्तुगीजांनी कालिकतमध्ये पाय ठेवल्यानंतर झामोरिन राजाकडे मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापारासाठी परवाने मागितले. झामोरिनने परवानगी दिल्यानंतर वास्को-द-गामाने लिस्बनला जाताना मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ नेले. या मसाल्यांची किंमत त्याच्या भारत सफरीच्या खर्चापेक्षा तिप्पट होती. पण पोर्तुगीजांना हाव सुटली आणि त्यांनी मुस्लिम व्यापाºयांना झामोरिनने अटकाव करावा, अशी मागणी केली. अर्थात झामोरिनने ही मागणी फेटाळल्यानंतर वास्को-द-गामाने कालिकतवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोर्तुगीजांनी कोचीन, क्विलॉन या मलबार किनारपट्टीवर किल्ले आणि वखारी बांधल्या व आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. पोर्तुगीजांच्या या दहशतीमुळे इजिप्तच्या राजाचा संताप अनावर झाला. त्याने गुजरातमधील राजा, झामोरिन, विजापूर, अहमदनगर येथील राजांशी एकजूट करून पोर्तुगीजांवर 1509मध्ये हल्ला केला. पण पोर्तुगीजांच्या आरमाराने या सर्वांचा दारुण पराभव केला. या घटनेनंतर पोर्तुगीजांचे पर्शियन आखात व लाल समुद्रातील व्यापारावर वर्चस्व झाले.
1510मध्ये अल्बुकर्कने विजापूरच्या सुलतानाकडून गोवा ताब्यात घेतला. गोवा हे उत्तम नैसर्गिक बंदर होते व तेथून गुजरात आणि मलबार किनारपट्टीवर चालणाºया व्यापारावर नियंत्रण ठेवता येत होते. त्याचबरोबर दख्खनमधील घडामोडींवरही लक्ष ठेवता येते. पोर्तुगीजांनी नंतर दांडा-राजुरी, दाभोळ ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेतील कोलंबो, ईस्ट इंडीज बेटावरील जावा, सुमात्रा, मलाक्का बंदर ताब्यात घेतले. त्याचबरोबर लाल समुद्राच्या मुखाशी असलेले सोकोत्रा हे महत्त्वाचे बंदर व एडनला वेढा घातला. पण त्यांना एडन ताब्यात घेता आले नाही. अशा रीतीने पोर्तुगीजांनी मुस्लिम व्यापाºयांना शह देण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना मर्यादित यश मिळाले, पण ऑटोमन तुर्कांना पोर्तुगीजांचे मोठे आव्हान वाटले. 152९मध्ये तुर्कांनी व्हिएन्नाला वेढा घातला होता. त्याअगोदर त्यांनी 1514 मध्ये इराण ताब्यात घेतले होते. त्यानंतर सीरिया, इजिप्त आणि अरेबिया ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हिंदी महासागराकडे आपले लक्ष वळवले. 1536मध्ये त्यांनी भारतीय समुद्रात पोर्तुगीजांची आरमाराच्या साहाय्याने कोंडी केली होती, पण त्यात फारसे यश आले नाही. त्यानंतर मात्र तुर्कांनी पोर्तुगीजांशी करार करून युरोपकडे आपले लक्ष वळवले.
पोर्तुगीजांनी गोवा वगळता भारताच्या इतर प्रदेशात ढवळाढवळ केली नाही की हे प्रदेश जिंकण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यांनी मसाल्याच्या पदार्थांवर नियंत्रणासाठी आपले सर्व सागरी सामर्थ्य वापरले. या मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारातून लॅटिन अमेरिकेतून भारतामध्ये बटाटा, मका आणि अननस ही तीन महत्त्वाची पिके आली आणि त्यामुळे आपल्या खाद्यसंस्कृतीत आमूलाग्र बदल घडला. पोर्तुगीजांचे साम्राज्य नंतर डच आणि इंग्रजांनी संपुष्टात आणले. पण मसाल्याच्या पदार्थांच्या निर्यातीतील भारताचे साम्राज्य आजही अबाधित आहे आणि त्याची राजधानी कालिकत हीच आहे!
sujayshastri@gmail.com