
आमच्याकडे माझी मैत्रीण आली होती, तिची मुलगी लग्नाची होती. तिला त्या ठिकाणी दाखवण्याचा कार्यक्रम होता, त्या आधी ती म्हणे पत्रिका बघा. पत्रिका बघितली, चांगले गुण उतरले, गोत्र जमले पण ‘प्रीतिषडाष्टक’ आहे, असे कळल्यावर कार्यक्रम करावा की नाही, असा तिला प्रश्न पडला. त्यावर चर्चा झाली. मी सर्व बोलणे ऐकत होते.
मला माझ्याबद्दल झालेली घटना सांगावी की नाही असे सारखे वाटत होते. कारण तो कार्यक्रम करू नये, याबाबत त्यांचे अगदी ठाम मत होते. पण मला राहवले नाही म्हणून मी तिला म्हटले, ‘माझ्या पण पत्रिकेत ‘प्रीतिषडाष्टक’ होते. त्यामुळे माझ्या वडलांनी साफ नकार दिला. मला तर म्हटले, तुम्हा दोघांची सतत भांडणे झाली, त्यातून वेगळेच काही निर्माण झाले तर कोण जबाबदार? त्यामुळे हे लग्न करणे योग्य नाही.’ प्रीतिषडाष्टक असले तर जमत नाही, भांडण होते, असे म्हणतात. ज्यांच्या पत्रिकेत प्रीतिषडाष्टक नाही ते भांडतात, घटस्फोट घेतात. मग काय म्हणावे त्यांना सांगा, असे विचारल्यावर म्हणे त्यांचे नशीब! मी ठाम ठरवले होते. मी करीन तर हेच लग्न करीन. आमचे भांडण झाले तरी ते तुमच्यापर्यंत येणार नाही. तुम्ही जास्त काळजी करू नका. आज आमच्या लग्नाला 20 वर्षे झाली, अगदी आनंदात, सुखात आहोत. तिला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला; पण ती मला म्हणाली, तुम्ही दोघे चांगले म्हणून काही नाही झाले; पण... तिच्या मनात अनेक शंका निर्माण होत होत्या. मला पण क्षणात वाटले, आपण का म्हणून तिला आग्रह करायचा? मी फक्त माझे उदाहरण देऊ शकत होते ते दिले.
शेवटी लग्न म्हणजे काय गं! एकमेकांबद्दल असणारा विश्वास, समजूतदारपणा, चूकभूल माफ करणे. एकमेकांबद्दल प्रेम महत्त्वाचे. ‘प्रेम, विश्वास, फुलांमधील सुगंध, गोड सुवास, हृदयात असावे प्रेम, प्रेमावर असावा विश्वास, यातच असावा सुखाचा सहवास,’ हेच खरे! तिला एकीकडे पटत होते; पण मन धजत नव्हते.
मीच तिला म्हटले, नको करू जास्त विचार. तुला जरी ते स्थळ चांगले वाटत असले तरी तुझ्या मनातून ‘प्रीतिषडाष्टक’ जाणार नाही. यापेक्षाही चांगले स्थळ मिळेल, अशी तिची समजूत काढण्यापलीकडे काहीच माझ्या हातात नव्हते. हळूहळू तिने तिच्या घरी जाण्याची तयारी केली. मला मात्र तिच्यामुळे माझी आठवण आली. पुन्हा मी आमच्या आठवणींत रमले...