या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मान्य आहे, जगणे हे सतत प्रेम करण्यासारखे नसते!
कारण तसे नसते तर दयामरण संकल्पनाच अस्तित्वात आली नसती. शरीराला आणि मनाला आनंद घेता येतो, ते सर्व या जगण्यावर निरतिशय प्रेम करतात. मंगेश पाडगावकरांची कविता अगदी समर्पक आहे.
चंचल वारा, या जलधारा, ओली माती, रुजून आलेली पाती आपल्याला किती सुंदर अनुभव देतात. ते सुख तनामनात भरून जाते.
रंगांचा उघडुनिया पंखा, सांज कुणी ही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली, सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे, या जन्मावर...
निसर्गरूपी परमेश्वराने हे सृष्टीचे सुंदर सोहळे मांडलेले आहेत, त्याचा आनंद घेत जगावे. हे बघायला मिळाले. किती नशिबवान आपण!
हेच कशाला, परवा टीव्हीवर शंकर महादेवन गात होता. श्रीनिवास खळेंना गुरुदक्षिणा म्हणून इतके अप्रतिम सूर लागले होते. बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... शिवाय शुक्रतारा! बापरे, अजून अंगावर काटा येतो. इतकी सुंदर प्रेमाची अनुभूती! भीमसेन जोशींनी म्हटलेले ‘बाजे मुरलिया बाजे’ पुन्हा शंकरकडून ऐकताना तोच अनुभव आला, जेव्हा प्रथम ऐकले होते. आणि वाटले, याचसाठी तर जगायचे ना! हा आनंद इथेच आहे. स्वर्गात नक्की नाही! हे सारे पाहून वाटते, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...