Home » Magazine » Rasik » Marathi Language Day Special

माझी मायमावशी

मनोज जोशी | Feb 23, 2013, 23:45PM IST
माझी मायमावशी

मला कोणतीही नवीन भाषा शिकायला मनापासून आवडते. मला कोणत्याच भाषेचे वावडे नाही. भाषा अभ्यास हा माझा व्यासंग आहे. भाषेतले बारकावे, ढब मी प्रयत्नपूर्वक आत्मसात करतो. त्यामुळे मी कोणत्याही भाषेत सहजगत्या संवाद साधू शकतो.
मराठी आणि गुजराती या दोन भाषांपैकी कोणती भाषा जास्त जवळची वाटते, असं कोणी मला विचारलं तर त्याचं उत्तर देणं कठीण आहे. कारण या दोन भाषांमध्ये मी आई/मावशी असा भेद करूच शकणार नाही. दोन्ही भाषा मला तितक्याच प्रिय आहेत. मी या दोन भाषांच्या मांडीवर खेळलोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. मराठी भाषा अवगत नसती तर मला ज्ञानेश्वरी कळलीच नसती, मला तुकाराम समजून घेता आले नसते. मराठीवर माझे प्रभुत्व आहे, मी मराठीच्या कुशीत वाढलो, याचा मला निश्चितच अभिमान आहे. मी महाराष्ट्रात कुठेही गेलो तर ‘तुम्ही मराठी की गुजराती?’ यावर लोक पैज लावतात. बोलीभाषांचे मला जास्त आकर्षण आहे. मराठीत जसे कोकण, तळकोकण, मराठवाडा, खान्देश इ. प्रांतानुसार भाषेची ढब, बाज बदलतो; तसेच गुजरातीचेही आहे. सुरतची गुजराती वेगळी, वलसाडची वेगळी, उत्तर गुजरातची वेगळी... मी आईशी उत्तर गुजरातच्या गुजरातीत बोलतो, पण वडलांशी मात्र मराठीतच बोलणे जास्त ‘कम्फर्टेबल’ असते. मी जन्माने गुजराती आहे, पण महाराष्ट्र हीच माझी कर्मभूमी आहे. इथल्या मातीत घट्ट मुळं रोवून मी छान डेरेदार वृक्षासम झालोय. शिवाजी महाराजांच्या काळात आमचे पूर्वज महाराष्ट्रात आले, असे सांगितले जाते. माझे वडील नवनीतशास्त्री जोशी हे व्यासंगी राष्ट्रीय कीर्तनकार होते. ते मराठीतून कीर्तन करत. पुणे येथे कीर्तन महाविद्यालय सुरू करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. वडलांमुळेच मराठी वेद, पुराणे, उपनिषदे, मोरोपंतांची आर्या, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ अशा थोर संतांचे साहित्य, अभंग यांचे संस्कार कळत-नकळत माझ्यावर झाले. अभिनेता म्हणून माझ्यावर वडलांचा खूप मोठा प्रभाव आहे. घरात जरी गुजराती भाषा बोलली जात असली तरी माझे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील गोरेगाव या गावी मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. मला लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्याने हाताला लागेल ते वाचत गेलो. मराठीमध्ये पु. ल. देशपांडे, कवी बा. भ. बोरकर यांच्या साहित्याचे मला विशेष आकर्षण. पुढे रंगभूमीवर काम करताना या वाचनाचा मला खूप फायदा झाला. वाचनाने आपले विचार प्रगल्भ होतात, जाणिवा विस्तारतात, भाषेचा ‘लहेजा’ कळतो. मला खरं तर चित्रकार व्हायचे होते, पण काही कारणांमुळे चित्रकलेचे शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर काही दिवस मी अनेक मराठी, गुजराती मासिकांमध्ये कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम केले.
माझ्यावर नाटकाचे संस्कार मराठी रंगभूमीने केले. ज्येष्ठ मराठी कलावंतांच्या प्रभावाखाली मी घडलो. गुजराती रंगभूमीवरही काम केले, पण मालिका मात्र मराठीच केल्या. दूरदर्शनवरील ‘राऊ’ ही माझी पहिली मालिका. गुजराती मालिका मी केल्या नाहीत. गुजराती रंगभूमीवर मी ‘घाशीराम कोतवाल’सारखे नाटक घेऊन गेलो, पण त्याचा पोत मराठीच ठेवला. त्यामुळे हे नाटक गुजरातीत करतानाही मला खूप मजा आली. तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे.
दोन्ही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी आम्ही आत्मसात केल्या आहेत. आमच्या घरी केला जाणारा स्वयंपाकही गुजराती/मराठी दोन्ही प्रकारचा असतो. सध्या इंग्रजीचा वाढता प्रभाव असला तरी आईवडलांनी आपली मातृभाषा, संस्कृती पुढच्या पिढीकडे जाणीवपूर्वक प्रयत्नाने नेली पाहिजे. आपण ज्या राज्यात राहतो तिथली भाषा आपल्याला आलीच पाहिजे. मी माझ्या मुलांना गुजरातीबरोबरच मराठी भाषेचे संस्कारही दिले आहेत. त्यांची वाचनाची आवड जोपासली आहे. त्यांच्या शंकानिरसनासाठी मी, माझे बाबा किंवा घरातील शब्दकोश आहेतच...

Email Print
0
Comment