
दिवसभराचे चेह-याचे संरक्षण हा फार महत्त्वाचा भाग असतो. अंघोळ करून नुसते पावडर, कुंकू लावून बाहेर पडणे म्हणजे बिचा-या चेह-याच्या त्वचेला वारा, थंडी, कोरडेपणा या सर्व सौंदर्यशत्रूंना तोंड द्यावे लागते. मग त्याचे संपूर्ण दिवस संरक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. यावर त्वचेला आर्द्रता देणारी प्रसाधने हे एकमेव उत्तर आहे. मॉइश्चरायझर हे प्रसाधन या हवेत फार महत्त्वाचे आहे. त्यामध्ये हिवाळ्यात क्रीम पद्धतीचे व उन्हाळ्यात लोशन पद्धतीचे मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे आहे.
काही मॉइश्चरायझर्स ही खूप प्रौढ त्वचेसाठी असतात. त्यात प्रथिनांचे धागे-इलॅस्टिन कोलिजीनचा वापर केलेला असतो. त्याचा उपयोग बारीक सुरकुत्या कमी होण्यासाठी होतो. ब्युटिकचे ‘इलाजीन’ मॉइश्चरायझर हे एक उदाहरण आहे. काही क्रीम्समध्ये अरोमा ऑइल असतात. काही क्रीममध्ये व्हॅसलीन किंवा पेट्रोलियम जेली, पॅरॅफिन वॅक्स वगैरे पदार्थपण असतात व त्यांमुळे कोरड्या हवेपासून चांगले संरक्षण होते. ही प्रसाधने संपूर्ण दिवसभर चेहरा, मान, गळा यांना लावावीत.
घरच्या घरी मॉइश्चरायझर बनवण्याची कृती :
* 1 भाग ग्लिसरीन + 1 भाग लिंबाचा रस + 2 भाग गुलाब पाणी किंवा केमिस्टकडे मिळणारे ‘विच हेझल’ किंवा ऑरेंज वॉटर यांचे मिश्रण बाटलीमध्ये भरून ठेवावे व अंघोळीनंतर बाटली खूप हलवून थोडे चेह-यावर लावावे. दुपारी तोंड धुतल्यास परत लावणे आवश्यक आहे.
* ज्या स्त्रियांना तेलकटपणा आवडत नसेल त्यांनी अल्कोहोल नसलेले स्किन फ्रेशनर किंवा टोनर अंघोळीनंतर चेह-यावर लावणे आवश्यक. त्वचेवरील निघून जाणारे व त्वचेला त्यामुळे येणारा कोरडेपणा वाढवणारे त्वचेतील बाष्प किंवा पाणी टिकवून धरणा-या पार्लरच्या गॅल्व्हनिक फेशियल - मरीन फेशियल - सीवीड फेशियल अशा प्रक्रिया नियमित करणे हेही महत्त्वाचे आहे.
नरिशिंग किंवा संवर्धन - चेह-यावर आपण सतत कुठलेही स्निग्ध पदार्थ चोळून लावणे याला नरिशिंग म्हणतात. यामध्ये सर्व तेलांचा समावेश आहे. तीळ, खोबरेल, एरंडेल, सूर्यफूल यासारखी खाण्यातील तेले किंवा तूप / साय / दूध /लोण्यासारखे दुग्धजन्य पदार्थ हे त्वचेचे उत्तम संवर्धक आहेत. कोल्ड क्रीम हे सर्वमान्य प्रॉडक्ट भरपूर लावणे योग्य ठरेल. कोल्ड क्रीम आपण दिवसा, रात्री दोन्ही वेळा लावू शकता. व्हिटॅमिन असणारीही बरीच क्रीम्स बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचाही वापर थंडीत झाला पाहिजे. चेह-यावर जर रात्री तेलाचे आवरण असेल तर त्वचेतील आर्द्रतेचा ºहास रात्रीही होत नाही व सदैव त्वचा नितळ व चमकदार राहते. थंडीमध्ये चेह-याचे संवर्धन केले तर उन्हाळ्यात जेव्हा खूप गरम हवा असते तेव्हा चेह-यावर कोणताही तेलकट पदार्थ लावला नाही तरी चालेल. कारण आपण थंडीच्या दिवसात घेतलेली काळजी पुढे उपयोगी पडते.