वाचले नसले तरी अनेकांनी ‘द फाउंटनहेड’ या पुस्तकाचे नाव ऐकले असेलच. काहींनी पुस्तक वाचलेही असेल. आयन रँड यांनी लिहिलेले हे पुस्तक जगप्रसिद्ध झाले आणि लेखिकेला त्याने मोठे नाव मिळवून दिले. या पुस्तकाच्या 60 लाखांच्या वर प्रती खपल्या आहेत.
कथेचा नायक होवार्ड रोआर्क हा एक अत्यंत स्वतंत्र वृत्तीचा आर्किटेक्ट. त्याचे मॉडर्न विचार समजण्याची कुवत नसलेल्या समाजात वावरताना त्याचा होणारा संघर्ष, त्याचे विचार, त्याला येणारे बरे-वाईट अनुभव यांचे अप्रतिम चित्रण पुस्तकात आढळते.
रोआर्कला कॉलेजमधून काढून टाकण्याचा प्रयत्न होतो. तो शिक्षण अर्धवट सोडून न्यूयॉर्कला जातो. तिथे हेन्री कॅमेरोन नावाच्या आर्किटेक्टकडून त्याला ब-याच गोष्टी शिकायला मिळतात. याच वेळी पीटर किटिंग हा रोआर्कचा समकालीन, पूर्ण भिन्न स्वभावाचा आणि विचारांचा आर्किटेक्ट मोठ्या पदावर नोकरीला लागतो. दोघांचा स्वभाव, मतभिन्नता, त्यांच्यातले संवाद, चढाओढ आणि वारंवार काही ना काही कारणाने ते आयुष्यभर एकमेकांसमोर येत जातात. हे सर्व गुंतागुंतीचे वर्णन वाचकाला खिळवून ठेवणारे आहे.
पुढे रोआर्कला नोकरीवरून काढून टाकण्यात येते आणि तो एक खाणकामगार म्हणून काम करू लागतो. तिथे त्याला डॉमनिक भेटते. दोघांमधले आकर्षण, दोघांचे स्वतंत्र व ठाम स्वभाव त्यातून निर्माण होणारे मतभेद आणि त्याचबरोबर वाटणारे शारीरिक आकर्षण यांचे जबरदस्त वर्णन आढळते. स्त्री-पुरुष नात्याचे अनेक नवे पैलू, त्यांची गुंतागुंत, नियतीसमोरची हतबलता लेखिका आपल्यासमोर अशा काही तºहेने मांडते की आपण अवाक् होऊन जातो.
रोआर्कला मॉडर्न इमारती बांधायच्या असतात, परंतु समाज मात्र अजूनही जुन्या परंपरेच्या स्थापत्यकलेत अडकलेला. रोआर्कचे विचार त्याची दृष्टी समजून घेणारे, अशा तरुणाला काम देणारे अत्यंत कमी असतात. या परिस्थितीतही त्याची जिद्द, त्याचे निर्णय, लोकांची पर्वा न करणारा त्याचा स्वभाव, एकटेपणा आपल्याला दिसतो.
एका प्रसिद्ध वृत्तपत्रात आर्किटेक्चरवर लेखन करणारा एक प्रसिद्ध लेखक टूही पुढे कथेत येतो. रोआर्कला संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे त्याचे प्रयत्न आपण पाहतो. या ठिकाणी रोआर्कचा मनस्वीपणा, बेदरकार वृत्ती दिसून येते. त्याच्या प्रयत्नांचा रोआर्कवर काडीचाही परिणाम होत नाही. उलट त्याचे हे वागणे टूहीलाच बुचकळ्यात पाडते. तो खचतो. एका प्रसंगी टूही रोआर्कला विचारतो,‘ What do you think of me? त्यावर रोआर्क अत्यंत शांतपणे उत्तर देतो I don’t think of you!!l
पुढे कथेत इतरही अनेक पात्रे येतात. कथा अनेक वळणे घेत आकार घेते. कथेतील सर्व पात्रे लेखिकेने अत्यंत जिवंत साकारली आहेत. मानवी स्वभाव, इगो, मानवी नातेसंबंध, मनाचे अनेक पैलू लेखिका आपल्यासमोर ठेवते.
Individualism विरुद्ध collectivism हा रोआर्कचा संघर्ष लेखिकेने केवळ अप्रतिम मांडला आहे. कथेत पुढे काय घडते, कथेचा शेवट काय या सगळ्यातून शेवटी काय निष्पन्न होते यासाठी पुस्तकच वाचायला हवे. एक ग्रेट कलाकृती, असेच या पुस्तकाचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे तुमच्या Must read यादीत हे पुस्तक नक्कीच समाविष्ट करा!
* द फाउंटनहेड
* आयन रँड
* बॉब्स मेरिल पब्लिकेशन