Home » Magazine » Rasik » Paksitan History

अपयशी राष्ट्राचा लेखाजोखा

अभिलाष खांडेकर | Feb 10, 2013, 03:00AM IST
अपयशी राष्ट्राचा लेखाजोखा

फाळणीनंतर भारत-पाक संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत. द्विराष्ट्रवादाच्या तत्त्वाला अनुसरून दोन्ही देशांची निर्मिती झाली, त्यानंतरही पाकिस्तानाने भारताची या ना त्या कारणाने खुसपट काढणे थांबवलेले नाही. जानेवारी 2013मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्याची घडलेली घटना व त्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेला इशारा हा काही उभय देशांमध्ये निर्माण झालेला पहिला (किंवा शेवटचा) तणाव नाही. एरवीसुद्धा पाकिस्तानातून भारतात दहशतवादी येतच असतात. काश्मीर खो-यामध्ये त्यांच्या कारवाया सुरूच असतात. परिणामी पाकिस्तान हा देश म्हणून सदासर्वकाळ चर्चेचा विषय बनून राहतो. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान या संपूर्ण विषयाला वाहिलेले ‘पाकिस्तान : ए न्यू हिस्टरी’ हे इयन टाल्बट लिखित ताजे पुस्तक वाचकांना नवा दृष्टिकोन देऊन जाते.

टाल्बट हे युरोपमधले नावाजलेले ब्रिटिश इतिहासतज्ज्ञ आणि लेखक आहेत. दक्षिण आशिया हा त्यांचा अभ्यासाचा विषय
आहे. पाकिस्तानवर तर ते अनेक वर्षे विशेष लक्ष ठेवून आहेत. ‘पाकिस्तान : ए मॉडर्न हिस्टरी’ हे त्यांचे पाकिस्तानवरचे पहिले पुस्तक दहाएक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. मात्र, प्रस्तुत नव्या पुस्तकात अनेकविध विषयांची भर पडली आहे.

पाकिस्तानविषयी आपले मत व्यक्त करताना लेखक लिहितो की, पाकिस्तान आतून ब-यापैकी पोखरलेला देश आहे. तेथे उद्योगधंदे कमी असल्याने रोजगाराच्या संधी कमी आहेत; उत्तम पाहुणचारासाठी पाकिस्तानी नागरिक ओळखले जात असले तरी अस्थिर राजकारण, न संपणारे तंटे आणि धार्मिक कट्टरता यातून आलेले वैफल्य, नैराश्य व अंतर्गत भांडणांमुळे पाकिस्तान हे एक अपयशी राष्ट्र(फेल्ड स्टेट) म्हणून जगभर ओळखले जात आहे. पाकिस्तानातील धर्मांधतेवर भाष्य करताना टाल्बट लिहितात, की शिया व सुन्नी पंथींशिवाय (लोकसंख्या 25%) देवबंदी व बरेलवी यांच्यात ब-यापैकी हेवेदावे आहेत आणि ते पाकिस्तानमधील धार्मिक तणावाला खतपाणी घालत आहेत.

एकूणच, प्रस्तुत पुस्तक पाकिस्तान निर्मितीपासूनचा थोडा परिचित व ब-यापैकी अपरिचित असा इतिहास, पाकिस्तान- अमेरिका, पाकिस्तान-चीन तसेच अफगाणिस्तान व जवळच्या देशांशी असलेले संबंध, अंतर्गत परिस्थिती, पाकिस्तानचे नेहमीच बिघडत- घसरत जाणारे अर्थकारण, राजकीय पक्षांच्या लाथाळ्या, वेळोवेळी सत्तेवर स्वार झालेले लष्करशहा- पाकिस्तानचा आर्थिक विकास अन् भाकिते, मूलतत्त्ववादी घटक, त्यांचे कडवे धर्मप्रेम अशा अनेकविध पैलूंवर प्रकाशझोत टाकते. याशिवाय पाकिस्तान जन्माला आला तेव्हापासूनच तिथे लोकशाही का मूळ धरू शकली नाही (पण भारतात ती बळकट का झाली); राज्यघटना बनवण्याचे प्रयत्न कसे हाणून पाडले गेले; 1954मध्ये गव्हर्नर जनरल गुलाम मोहंमद यांनी अचानक कॉन्स्टिट्युअंट असेंब्ली बरखास्त का केली; इस्लामाबादवर बंगाली वर्चस्व नको यासाठी राजकारण कसे खेळले गेले; राज्यांचे वर्चस्व नको म्हणूनच पंजाब प्रांत किंवा इतर भागातील राजकारण्यांना कसे दुर्बल केले गेले; 1952मध्ये पूर्व पाकिस्तानमधल्या भाषावार दंगली रोखण्यासाठी सैन्यास कसे पाचारण करावे लागले; या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचाही लेखकाने अत्यंत प्रभावीपणे वेध घेतला आहे.

‘पाकिस्तानचा पहिलाच अपयशी प्रयोग’ या प्रकरणात लेखक सूचकपणे सांगतो, की अगदी सुरुवातीलाच पाकिस्तान सैन्य व नोकरशाही यांच्या प्रभावाखाली आला. त्यांची एकाधिकारशाही रुजून लोकशाही कमजोर झाली ती आजतागायत. गेल्या काही आठवड्यांतील घटना, सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांना 22 अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दिलेला अटकेचा आदेश, मिनहाज-उल-कुराण या नवीन संघटनेचे प्रमुख डॉ. ताहीर-उल-कादरी यांचा प्रचंड मोर्चा व त्याला मिळालेला पाठिंबा या ताज्या घटना पुस्तकात नसल्या तरीही पाकिस्तानपुढची आव्हाने, सुशासन आणण्याची गरज, विश्वव्यापी बदलांमध्ये पाकिस्तानला वगळण्याऐवजी सामावून घेणे, लष्करी-नागरी संबंध सुधारणे, शिक्षण व सामाजिक सुधारणा, आर्थिक सुधारणा हे सगळे जर पाकिस्तानमध्ये घडले तर ते राष्ट्र स्थिरावेल व तिथल्या समस्या कमी होतील, अशीही आशावादी मांडणी लेखकाने या पुस्तकाद्वारे केली आहे. मे 2011मध्ये अमेरिकेने ‘अल काइदा’चा म्होरक्या ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात ठार मारल्याने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेली अब्रू, चीनशी झालेली जवळीक, या संबंधांना अमेरिकेचा असलेला खुला विरोध, चिनी उद्योगधंद्यांची पाकिस्तानातील वाढती गुंतवणूक आदी ताज्या घडामोडींचेही टाल्बट यांनी अत्यंत बारकाईने विश्लेषण केले आहे. पाकिस्तानात जितकी अराजकी परिस्थिती येईल आणि एक देश म्हणून तो निराशेत बुडत जाईल, तितकी भारताची डोकेदुखी वाढत जाईल, याचे सुस्पष्ट आकलन पुस्तक वाचल्यावर होतेच, परंतु पाकिस्तानला चांगले दिवस येण्याची चिन्हे नजीकच्या काळात दिसत नाहीत, या वास्तवाकडेही हे पुस्तक निर्देश करते.

पाकिस्तान : ए न्यू हिस्टरी, लेखक : इयन टाल्बट,
पाने : 311/ प्रकाशक : अमरलीज, किंमत : 499

abhilash@dainikbhaskargroup.com

Email Print
0
Comment