जाहिरात
 
 
 

‘शिव’धनुष्य पेलताना...

 
Source: माधव जोशी   |   Last Updated 22:47(18/02/12)
 
 
 

‘ग्रंथाली’ची कारकीर्द संपल्यानंतर ‘आपला परममित्र’ या वैचारिक स्वरूपाच्या नियतकालिकाचे संपादन आणि संचालन करत असताना अनेक लेखकांशी संबंध येत गेला. अंकाबरोबरच पुस्तके प्रकाशित करू लागलो. या सगळ्यात लेखक, प्राध्यापक, विचारवंतांच्या भेटीगाठींमध्येच पुण्यातल्या संतोष शिंत्रे हे वेगळ्या धाटणीचे लेखक भेटले. पाच-सहा वर्षांपूर्वीची ही गोष्ट. त्या वेळी ते शिवाजी महाराजांवरील एका वेबसाइटचे लेखन आणि संपादन करत होते. गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेल्या महाराजांवरील चरित्राचा आणि त्यांच्या इंग्लिशमधील यासंबंधीच्या टिपणांचा खूप उपयोग झाला, असे ते म्हणाले. साधारणपणे चौदा-पंधरा वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये केतकरांनी मेहेंदळे लिखित शिवचरित्रावर अग्रलेख लिहिला होता. याच गप्पांच्या ओघात शिंत्रे म्हणाले की, मेहेंदळ्यांचे ‘शिवाजीज नेव्ही’ हे टिपण खूपच चांगले झाले आहे. त्यातूनच गजानन भास्कर मेहेंदळे या प्रख्यात इतिहास संशोधकाची भेट झाली. मेहेंदळे, शिंत्रे यांच्याबरोबरच्या भेटीमध्ये शिवाजी महाराजांचे इंग्लिशमधील चरित्र का प्रकाशित करू नये? असा विषय पुढे आला आणि एका प्रदीर्घ विचारमंथनातून इंग्लिशमधले शिवाजीचे रऌकश्अखक : ऌकर छकऋए अठऊ ळकटएर हे चरित्रपुस्तक मेहेंदळे लिहिणार आणि ‘परममित्र’ प्रकाशित करणार हे निश्चित झाले. पण त्याचे तपशील ठरवताना अडचणी, आव्हाने दिसू लागली. मुख्यत: अडचण पैशांची होती. हा संपूर्ण प्रकल्प 25 लाखांच्या घरातला होता. रॉयल्टीची रक्कम लेखकाला प्रकाशनपूर्व द्यायची होती. मेहेंदळ्यांबरोबर करार झाला. साधारणपणे एक-दीड वर्षात त्यांनी पुस्तक लिहून द्यायचे ठरले.

सहा-आठ महिन्यांनंतर शिंत्र्यांचा निरोप आला की पुस्तकाचा पहिला खर्डा तयार आहे. लगेच आमची संयुक्त भेट झाली आणि पुढील तीन-चार महिन्यांत पुस्तक सिद्ध होणार असे दिसू लागले. पण हा ‘पण’च खूप मोठा होता. या दरम्यानच्या काळात ज्या काही भेटीगाठी झाल्या; ज्यांना मेहेंदळे माहीत होते त्यांनी सावधगिरीचे इशारे द्यायला सुरुवात केली. ‘मराठीतले मेहेंदळ्यांचे शिवचरित्र दोन खंडांचे असले तरी ते अजून पूर्ण झालेले नाही’, ‘त्यांच्या खनपटीला बसून त्यांच्याकडून ते पूर्ण करून घ्या...’ इत्यादी गहिरे रंग भरण्यास सुरुवात झाली. ज्यांनी प्रेमापोटी उसने पैसे देऊ केले होते, त्यांच्याकडून विचारणा सुरू झाल्या. 2010च्या अखेरीस वजनाने हलका असणारा दर्जेदार आयात केलेला कागद खरेदी केला. पुढे या 1000 पानांच्या पुस्तकासाठी लागणारा कागद ठेवण्यासाठी खूप मोठी जागा व्यापली गेली. सिद्धी आॅफसेटचे टिपणीस आता विचारणा करू लागले की कागदामुळे जागा अडते, कधी पुस्तक छापायला देणार? या सगळ्या दोन-अडीच वर्षांच्या काळामध्ये ‘आपला परममित्र’ या अंकाकडे काहीसे दुर्लक्ष झाले. जाहिराती मिळवण्यासाठी वेळ मिळेनासा झाला. परंतु इंग्लिशमधील शिवचरित्र प्रकाशित करायचे हा निर्धार होता आणि मेहेंदळे हे पुस्तक  आज ना उद्या देतील असा विश्वासही होता.

गजानन भास्कर मेहेंदळे या नावाबद्दल खूप आकर्षण थेट ‘मटा’मधला अग्रलेख वाचल्यापासूनच  होते. गेली 30-40 वर्षे फक्त ते शिवाजीचाच अभ्यास करत होते. ‘भांडारकर इन्स्टिट्यूटवरील हल्ल्यानंतर ते मराठीतले शिवचरित्र पूर्ण करतीलच असे नाही.’ ‘आता गेली 10-12 वर्षे ते दुसºया महायुद्धाचा अभ्यास करत असून त्यावरील 1000 पानांचा बृहत ग्रंथ ते साकारणार आहेत,’ या गोष्टी ऐकल्या होत्या. त्याचे प्रत्यंतर भेटीगाठीतून येतच होते. या शिवचरित्रात प्रकाशकाचे निवेदन असावे असे सुचवताच ताडकन त्यांनी नकार दिला. दरम्यानच्या काळात शिंत्र्यांना त्यांनी असे सांगितले की प्रकाशकांना जर घाई असेल तर हा प्रकल्प सोडून देतो. या सगळ्यांतून मेहेंदळ्यांचे मनस्वी व्यक्तिमत्त्व उलगडत गेले. प्रचंड व्यासंग, असंख्य पुस्तकांचा अभ्यास, आपण लिहीत असलेली प्रत्येक ओळ पुराव्याला धरून आहे की नाही, याची अनेक वेळा केलेली खातरजमा... असे सगळे मेंहदळेंच्या लौकिकास साजेसे होत गेले. याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर ‘बनावट फारसी फतव्यासंदर्भात’ हे पुस्तक पूर्ण होताना त्यांनी प्रसिद्ध इतिहास संशोधक इरफान हबीब यांच्याशी अगदी शेवटच्या क्षणी खातरजमा करून घेतली. काम पूर्ण होईस्तोवर जागेवरून न उठणे, मग ती रात्र संपून दुसरा दिवस उजाडला तरी चालेल, अशी त्यांची कार्यशक्ती व स्वत:च्या कामावरील निष्ठा. कुठल्याही कार्यक्रमास न जाणे, प्रसिद्धी न करणे, जनसंपर्कासाठी धावपळ न करणे, आपला अभ्यास, लेखन हाच जीवनाचा आनंद आणि ध्येय मानणारे मेहेंदळ्यांचे लोभसवाणे व्यक्तिमत्त्व. शिवाजीचा अभ्यास करताना पोर्तुगीज, फ्रेंच, फारसी भाषा ते शिकले. या भाषेतील शिवकालीन असलेले संदर्भ तपासले. त्या वेळची प्रचलित असलेली  

विविध कालगणना पडताळली. शिवाजीचा सैनिकीदृष्ट्या सुरू केलेला अभ्यास व त्यानंतर शिवकालीन समाजकारण, राजकारण, अर्थकारण याचा अभ्यास करून शिवाजी या महापुरुषाचे समग्र व भव्य असे चित्र आणि चरित्र सिद्ध झाले.

रऌकश्अखक : ऌकर छकऋए अठऊ ळकटएर हे 1000 पानी पुस्तक 29 डिसेंबर 2011 रोजी अखेरीस प्रकाशित झाले. सर जदुनाथ सरकार यांनी 1907च्या सुमारास लिहिलेले शिवचरित्र, त्यानंतरचे बाळकृष्णन यांचे शिवचरित्र, यानंतर गेल्या सत्तर वर्षांत असा ग्रंथ झाला नाही. सेतुमाधवराव पगडी यांनी लिहिलेले चरित्र आकाराने खूपच लहान व संक्षिप्त असे आहे. जदुनाथांच्या वेळी असलेल्या उपलब्ध पुराव्यांवर आधारित त्यांनी चरित्र लिहिले. त्यातच त्यांचा मराठी व मोडी लिपीचा फारसा अभ्यास नव्हता. तेव्हा आपल्याला असे निश्चित सांगता येईल की म्हणून कुठल्याही भारतीय माणसाने नव्हे तर मराठी माणसानेही असा प्रयत्न, अभ्यास करून असे बृहत शिवचरित्र लिहिलेले नाही. शिवाजी महाराजांची पुण्याई, आम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर आमच्या मित्रमंडळींचा विश्वास, आंतरराष्टÑीय भाषा म्हणून इंग्लिश भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन इंग्लिश भाषेमधले हे शिवचरित्र आम्ही प्रकाशित केले. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित हे शिवचरित्र म्हणूनच   ऐतिहासिक दस्तऐवज आहे आणि याची निर्मिती हाही आता एक अभिमान वाटावा असा इतिहास आहे.

param_mitra@yahoo.com

 
मागील बातमी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
4 + 4

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment