छान सरलं आयुष्य तुझ्या सुंदर सहवासात
हातात हात असाच राहू दे
आता संध्याकाळच्या प्रवासात
एकमेकांवरचा विश्वास म्हणजेच प्रेम - एमेकांच्या आश्वासक सहवासात निर्माण होणारी शुद्ध प्रेमभावना विशिष्ट दिवशी व्यक्त करण्यात त्यात गैर काही नाही. नुकताच लग्नाचा बत्तिसावा वाढदिवस साजरा केलेले प्रमोद सुमंत सांगत होते. माझी पत्नी प्रज्ञा शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे. आमच्या बत्तीस वर्षांच्या सहवासात एकमेकांशी वाद झाले नाहीत असं नाही; पण कोणत्या घटनेला किती महत्त्व द्यायचं, वाद कुठपर्यंत ताणायचे याचे संस्कार दोघांवरही झाले असल्याने, टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली नाही. इंटरनेटमुळे आजची पिढी एकमेकांच्या अधिक जवळ येतेय हे चांगले आहे; पण तरीही आपापसात पटलं नाही तर लगेच दूर होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. आमच्या पिढीच्या तुलनेत या पिढीच्या भौतिक गरजा सहज पूर्ण होत असल्याने पिढी आत्मकेंद्रित बनली आहे. या वृत्तीमुळे वैवाहिक आयुष्यात समस्या उदभवतात.
माहिती तंत्रज्ञानामुळे या पिढीचा प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन विस्तारला आहे; पण दुर्दैवाने एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो, स्वत:हून पुढाकार घ्यावा लागतो ही गोष्टच या पिढीला समजलेली नाही. कुठे बोलायचं यापेक्षा कुठे थांबायचं हेच या पिढीला समजत नाही.
प्रत्येक नात्यात व्यक्तीला थोडीशी स्पेस मिळणं आवश्यक असतं, हे लक्षात घेतलं तर ते नातं सर्वांगानं फुलतं. फुललेलं हे नातं आणखी बहरण्यासाठी आवश्यक असतो तो एकमेकांचा सहवास. म्हणूनच एकमेकांवरचा विश्वास म्हणजेच प्रेम, असं आम्हाला वाटतं. - प्रमोद आणि प्रज्ञा सुमंत
प्रेम म्हणजे समजून घेणं - आमचं लग्न माझ्या आई-वडिलांनीच ठरवलं. मी माझ्या बायकोला, सुशीलेला प्रत्यक्ष लग्नातच बघितलं; पण आधी ओळख नव्हती, बघितलेलं नव्हतं म्हणून लग्नानंतरच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात आमचं कुठेही अडलं नाही. एकीकडे बँकेच्या एफडीचा फॉर्म भरणा-या प्रभाकर कुलक र्णी यांनी गप्पा मारता-मारता सांगितलं.
आजच्या पिढीची गोष्टच वेगळी आहे. पडद्यावरच्या चित्रपटातल्यासारखं सगळं गुडी-गुडी असावं, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे सुरुवातीला फिल्मी स्टाइलने प्रेम वगैरे करणा-या मंडळींचे लग्नानंतर डाळ-तांदळाचे भाव कळल्यानंतर डोळे उघडतात. नको तिथे मान-अपमान कुरवाळायची सवय आजच्या पिढीला झाली आहे. त्यामुळे कुठल्या वेळी कसं वागावं याचं भान राहत नाही आणि मग संसार मोडायची वेळ येते. प्रेम करणं आणि प्रेमविवाह करणं यात गैर काहीच नाही; पण मग ज्या हिमतीने तुम्ही प्रेम करता त्याच हिमतीने तुम्ही संसार करून दाखवला पाहिजे. संसार शेवटपर्यंत नीटनेटका करण्यासाठी आवश्यक आहे ते एकमेकांना समजून घेणं. - प्रभाकर आणि सुशीला कुलकर्णी
नात्याचा आदर करणं म्हणजेच प्रेम - प्रत्येक नात्यात स्वत:आधी दुस-याचा विचार केला तरच ते नातं टिकतं,बहरतं. म्हणूनच प्रत्येक नात्यात विशेषत: नवरा-बायकोच्या नात्यात स्वत:च्या आधी आपल्या साथीदाराचा विचार करायला हवा. लग्नाला पस्तीस वर्षे झालेल्या कमल वैद्य सांगत होत्या. माझे मिस्टर टपाल खात्यात नोकरीला होते. मी गृहिणी; पण मी केवळ गृहिणी आहे म्हणून ते मला कधी वाईट वाटेल असं बोलले नाहीत. आमच्या नात्यात आम्ही एकमेकांचा कायम आदर करत आलो आहोत.
आजची पिढी मात्र याबाबतीत असमंजसपणे वागते असं वाटतं. सुरुवातीला उत्साहाने डे वगैरे साजरे करायचे आणि लग्नानंतर सतत लहान कारणांवरून भांडायचे असे आजच्या पिढीचे वागणे आहे. नातं टिकवून ठेवणं ही मानलं तर तशी सोपी गोष्ट आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक आहे ते एकमेकांच्या मताचा आदर करणं, नात्याचा आदर करणं आणि यातच खरं प्रेम आहे. - विजय आणि कमल वैद्य