मुंबई - राज्यातील दहा महापालिकांपैकी ठाण्यामध्ये सर्वात जास्त 118 तर मुंबईमध्ये चार मतदान केंद्रे अतिसंवेदनशील असून मतदानाच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. राज्यात आचारसंहिता भंगाच्या 3000 प्रकरणांमध्ये आजपर्यंत गुन्हे नोंदवले गेल्याचे निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मंगळवारी सांगितले.
अमरावतीमध्ये सापडलेल्या एक कोटी रुपयांबाबत पोलिसांचा अहवाल आयोगाकडे आला असून आणखी काही माहिती त्यामध्ये हवी आहे. त्यामुळे अद्याप याप्रकरणी चौकशी संपलेली नसल्याचे त्या म्हणाल्या. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महापालिकांमध्ये एकूण 1244 जागांसाठी 9534 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. राज्यात एकूण 20,441 मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर पाच निवडणूक अधिकारी असतील.
मुंबईमध्ये मतदानासाठी गुरुवारी सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई महापालिका हद्दीतील शासकीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली मंडळे, महामंडळे आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचा-यांंनादेखील ही सुट्टी लागू होईल, असे राज्य सरकारतर्फे कळविण्यात आले आहे.