औरंगाबाद: औरंगाबादसह पुणे, जालना, अहमदनगर आणि हैदराबाद येथून दुचाकी चोरत त्या लोकांना विकणार्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन प्रेयसींच्या मदतीने पकडले. सय्यद इरफान सय्यद समी (35, रा. कैसर कॉलनी, जिन्सी) असे त्याचे नाव असून, या चोरट्यासह त्याच्या दोन साथीदारांकडून पोलिसांनी 9 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी जिन्सी भागातील एका रिक्षाचालकाला चोरीची दुचाकी घेऊन जाताना पकडले होते. पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून त्याने सय्यद इरफानकडून दुचाकी खरेदी केल्याची कबुली पोलिसांना दिली. इरफानने त्या रिक्षाचालकाला बाँड पेपरवर 28 हजारात दुचाकीची विक्री केली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चक्रे फिरवली. तेव्हा त्याचे आणखी दोन साथीदार असल्याचे कळले. यानंतर पोलिसांनी विनोद कुंडलिकराव जोगळे (30, रा. पुंडलिकनगर) आणि क्लीनर जनार्दन वामन लहाने (28, रा. चेतनानगर, हसरूल) या दोघांना ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच म्होरक्या सय्यद इरफान पसार झाला. विनोद जोगळेची रवानगी न्यायालयाने हसरूल कारागृहात केली आहे, तर जनार्दन आणि सय्यद इरफानला 24 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राजेंद्र दिगंबर शंख (रा. सुरेवाडी) या विद्यार्थ्याची दुचाकी 30 सप्टेंबर 2011 रोजी मध्यरात्री घरासमोरून चोरीला गेली होती. ही दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
बनावट क्रमांक टाकून विकल्या दुचाकी
चोरलेल्या दुचाकींवर बनावट क्रमांक टाकले जात असत. यानंतर जवळच्या लोकांना गाठून सय्यद इरफान 25 ते 30 हजारांपर्यंत दुचाकींची विक्री करीत असे. बँकेचे कर्ज न फेडल्याने जप्त केलेल्या दुचाकी असल्याची तो थाप मारायचा. हँडल लॉकच्या स्वीचची वायर काढून दुचाकी चोरत असे.
अशी झाली तिघांची ओळख
सैय्यद इरफान चारचाकी वाहनावर चालक असल्याने मिळेल तेथे तो भाडे घेऊन जात होता. यातूनच त्याची ओळख जोगळे आणि लहानेशी झाली होती. वेळ मिळेल तेव्हा सैय्यद इरफान दुचाक्या चोरत असे. यामध्ये त्याला जोगळे आणि लहाने मदत करत असे.
डॉक्टर पत्नीचा वाहनचोर पती
सैय्यद इरफान हा मुळचा हैदराबादचा. त्याने कैसर कॉलनीतील एका डॉक्टर युवतीशी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यानंतर तो शहरातराहायला आला. शहरातील नामवंत हॉस्पीटलमध्ये त्याची पत्नी डॉक्टर आहे.