जाहिरात
 
 
 

आठ तक्रारी, आठ तपासण्या, आठ अहवाल, परिणाम शून्य

 
Source: महेश जोशी . 9823440035   |   Last Updated 07:28(23/02/12)
 
 
 

सगळे कामधंदे सोडून न्यायासाठी जीटीएलकडे चकरा मारून थकलेल्या या माणसाचे नाव प्रवीण कमलाकर जोशी आहे. एकनाथ नगरजवळील द्वारकापुरी येथील रहिवासी असलेल्या जोशी यांच्यामागे जीटीएलचे शुक्लकाष्ठ लागले आहे. मीटरचे फोटो काढून बिल देण्याची पद्धत असतानाही त्यांना हा त्रास होत आहे. कारण मीटरवर दिसणारे युनिट आणि प्रत्यक्षात बिलात टाकण्यात येणारे युनिट प्रत्येक वेळी वेगवेगळे देण्यात येतात. गेल्या दहा महिन्यांपासून हा सिलसिला सुरू आहे. जोशी यांनी जीटीएलची चूक वारंवार त्यांच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली; परंतु त्यानंतरही कंपनी त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. यावर कहर म्हणून की काय, या कंपनीचे वसुली पथकही एकदा जोशी यांच्या घरी गेले. बिल भरा, नाही तर वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशा धमक्याही या पथकाने त्यांना दिल्या आहेत. प्रत्येक वेळी कायदेशीर मार्गाने कंपनीकडे तक्रारी करून काहीही उपयोग न झाल्याने अखेर जोशी यांनी डीबी स्टारशी संपर्क साधून आपली कैफियत मांडली. एखादी व्यवस्था सामान्य माणसाची कशी परीक्षा घेऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

पहिली तक्रार:

प्रवीण जोशी यांना दर महिन्याला सरासरी 450 ते 600 रुपये वीज बिल येत होते. मात्र, मे 2011 मध्ये त्यांना नेहमी येणार्‍या बिलाच्या एकदम पाचपट म्हणजे 1970 रुपये बिल आले. त्यांच्या मीटरवरील रीडिंग 2115 युनिट एवढी होती, तर बिलावर 2315 रीडिंग टाकण्यात आली होती. जोशी यांनी मीटरचा फोटो काढून जीटीएलला ही चूक लक्षात आणून दिली व याबाबत रीतसर तक्रारही नोंदवली. 8 दिवसांनंतर कंपनीचे लोक आले, त्यांनी मीटरची पाहणी केली आणि अहवाल तयार केला. आपल्या कंपनीची चूक असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर जीटीएलच्या अधिकार्‍यांनी जोशी यांना बिल न भरण्याचे सांगितले. त्यानुसार नवीन बिलात ही चूक दुरुस्त होईल अशी खात्री बाळगून ते निश्चिंत झाले.

 दुसरी तक्रार:

जून महिन्याचे बिल हाती पडताच जोशी यांना धक्का बसला. त्यांनी केलेल्या तक्रारीचा काहीच उपयोग झालेला नव्हता. मागील बिलातील थकबाकीसह जूनमध्ये त्यांना 3860 रुपये बिल देण्यात आले. त्यांनी पुन्हा तक्रार नोंदवली. पुन्हा जीटीएलची टीम पाहणी करून गेली. आठ दिवसांत अहवाल आला आणि नंतर जीटीएलने आपलीच चूक असल्याचे मान्य केले. जोशी यांना पुन्हा एकदा बिल न भरण्याचे सांगण्यात आले.

तिसरी तक्रार:

आता ही समस्या नक्कीच सुटल्याचे जोशी यांना वाटले; पण हा समज चुकीचा होता. लगेच पुढच्या जुलै महिन्याच्या बिलात त्यांना आणखी एकदा धक्का बसला. कारण या वेळी बिल 4700 रुपयांचे होते. त्यांनी पुन्हा एकदा मीटरचा फोटो काढून जीटीएलला दाखवला. बिलावर 2635 युनिट होते, तर प्रत्यक्षात 2209 रीडिंग होती. ही बाब त्यांनी जीटीएलच्या निदर्शनास आणून दिली. परत तक्रार दिल्यानंतर माणूस आला, पाहणी केली आणि अहवाल सादर करून गेला. यानंतर त्यांना प्रोव्हिजनल बिल देण्यात आले. मूळ बिलातच खाडाखोड करून 4700 ऐवजी केवळ 1550 रुपये भरण्याचे सांगण्यात आले. ही रक्कमही त्यांनी तत्काळ भरली.

चौथी तक्रार:  

ऑगस्टमध्ये बिलच नाही

जीटीएलचा सावळा-गोंधळ काही केल्या पिच्छा सोडायला तयार नव्हता. ऑगस्टमध्ये जोशी यांना बिलच आलेच नाही.

पाचवी तक्रार

ऑगस्टमध्ये जोशी यांना बिल आले नाही; पण लगेच सप्टेंबरमध्ये आलेले बिल पाहताच त्यांची झोप उडाली. हे बिल 8 हजार 680 रुपयांचे होते. या वेळी पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे त्यांनी परत एकदा तक्रार नोंदवली, नेहमीप्रमाणे जीटीएलची टीम आली, पाहणी करून गेली आणि आठवडाभरात अहवाल दिला. या वेळीही मीटरवरील रीडिंग 2449 युनिट असताना बिलावर 3025 युनिटचा उल्लेख होता. याचे फोटोही त्यांनी कंपनीला सादर केले. त्यानंतर कंपनीने मूळ बिलात खाडाखोड करून 1430 रुपयांचे बिल भरण्यास सांगितले. हे बिलही जोशी यांनी भरले.

सहावी तक्रार

ऑक्टोबरमध्ये त्यांना 8 हजार 780 रुपयांचे बिल आले. या वेळीही जोशी यांनी मेपासून सुरू असलेली प्रक्रिया पुन्हा राबवली. या वेळी त्यांना मूळ बिलात खाडाखोड करून 589 रुपयांचे मायनसमध्ये प्रोव्हिजनल बिल देण्यात आले. मागील काही महिन्यांपासून चुकीचे बिल देण्यात आले होते. त्यामुळे काही रक्कम जीटीएलकडे जमा आहे. यामुळे या महिन्यात बिल भरण्याची गरज नसल्याचे जोशी यांना सांगण्यात आले.

ऑक्टोबर महिन्यातच जोशी यांना आता तरी सुटलो असे वाटले. नोव्हेंबर महिन्यात त्यांना बिलच आले नाही.

सातवी तक्रार:

ऑक्टोबर महिन्यातच जोशी यांना आता तरी सुटलो असे वाटले. नोव्हेंबर महिन्यात त्यांना बिलच आले नाही.

आठवी तक्रार:

डिसेंबरमध्ये जोशी यांना 11 हजार 960 रुपयांचे बिल देण्यात आले. मागील बिल मायनसमध्ये होते. ते अद्यापही संगणकात अपडेट झाले नसल्याने हा त्रास होतोय, असे सांगून कंपनीने त्यांना बिल न भरण्याचा सल्ला दिला.

अवतरले वसुली पथक

डिसेंबरमध्ये बिल न भरण्याचा सल्ला देण्यात आल्याने निदान आता तरी जीटीएलला आपली चूक लक्षात आली असे वाटून जोशी काहीसे सुखावले; पण हा आनंद काही दिवसांचाच होता, कारण अचानक एकेदिवशी त्यांच्या घरी जीटीएलचे वसुली पथक अवतरले. त्यांनी 24 तासांची मुदत दिली. ‘बिल भरा, नाही तर वीज कापतो’, असा दम त्यांना देण्यात आला. वसुली पथकाचा आणि मुख्य कार्यालयाचा काहीही संबंध नसतो, अशी नवीनच माहिती त्यांना देण्यात आली. जोशी यांनी पुन्हा जीटीएलकडे धाव घेतली. जानेवारीच्या बिलात सर्व काही सुरळीत होईल, असे त्यांना सांगण्यात आले.

खोटी आश्वासने

नेहमीप्रमाणे जीटीएलने दिलेले हे आश्वासनही खोटे ठरले. जानेवारीत त्यांना 14 हजार 700 रुपयांचे बिल आले. पुन्हा वसुलीवाले येण्याआधीच जोशी यांनी जीटीएलचे कार्यालय गाठले. त्यांनी बिलाच्या रकमेच्या किमान 20 टक्के रक्कम म्हणजे 3000 रुपये भरण्यास सांगण्यात आले. पर्याय नसल्यामुळे त्यांनी ही रक्कम भरावी लागली.

ही तर नाहक शिक्षा

आम्ही सर्व काम नियमानुसार करतो. सर्व कर वेळेवर भरतो. लाइट बिलही कधीच थकवलेले नाही. असे असताना जीटीएलच्या चुकीची शिक्षा आम्हाला भोगावी लागत आहे. दहा महिने उलटल्यानंतरही आमचा त्रास कायम आहे. अशा कंपनीकडून ग्राहकाने काय अपेक्षा करावी?

-प्रवीण जोशी, जीटीएल ग्राहक  

जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांना थेट सवाल 

ती तांत्रिक चूक आहे 

>प्रवीण जोशी या माणसाला दहा महिन्यांपासून त्रास सहन करावा लागतोय? 

होय, ती गोष्ट आमच्या लक्षात आली आहे. याची आम्ही अत्यंत गांभिर्याने दखल घेतली आहे. लवकरच त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.  >जोशी यांना झालेल्या त्रासाची नेमकी कारणे काय?

त्यांना कोणताही आर्थिक दंड झालेला नाही. मानसिक त्रास झाला, हे आम्ही मान्य करतो. संगणकातील चुकांमुळे हा प्रकार घडण्याची शक्यता आहे.  >बातम्या आल्यानंतरच अशा प्रकारांची दखल घेतली जाते. सर्वसामान्य ग्राहकांना तुमच्या कंपनीत किंमत नाही काय?

आम्ही सर्वांच्याच समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो. यापुढे तरी ग्राहकांच्या अशा तक्रारी येणार नाहीत याची काळजी घेऊ.

>आता ही समस्या सोडवण्यासाठी किती कालावधी लागेल?

आठ दिवसांत ही समस्या सोडवली जाईल. त्यांना पुन्हा असा त्रास होणार नाही. फेब्रुवारीला जोशी यांना पुन्हा 13 हजार 350 रुपयांचे बिल देण्यात आले. हे बिल पाहून अखेर इतके दिवस सगळ निमूटपणे सहन करणार्‍या जोशी यांचा संयम सुटला. आता मात्र त्यांनी गेल्या आठ महिन्यांपासून विनाकारण माझा छळ का करता आहात? असे खडसावून विचारले. कुठलीही चूक नसतानाही त्यांची समस्या सोडवण्याऐवजी जीटीएलने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या जोशी यांनी ग्राहक मंच किंवा डीबी स्टारकडे धाव घेणार असल्याचे सांगितले. मात्र, मुजोर अधिकार्‍यांनी प्रत्येक लोकशाही मार्ग त्यांच्यासाठी खुला असल्याचे सांगून जोशी यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या दहा महिन्यांच्या पाठपुराव्याची खिल्ली उडवली. तक्रार निवारण कार्यालयाचे स्थलांतरयापूर्वी कंपनीचे ग्राहक तक्रार निवारण कार्यालय छावणीत होते; पण ऑक्टोबरमध्ये ते निराला बाजारमध्ये हलवण्यात आले, मात्र त्याची कोणतीही माहिती ग्राहकांना देण्यात आलेली नव्हती. यामुळे ग्राहकांना छावणीत जाऊन मग निराला बाजारमध्ये जाण्याचा त्रास होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
6 + 9

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment