Home » Maharashtra » Marathwada » Aurangabad » Honey Business

मधमाशी पालन व्यवसाय जोरात

दिव्य मराठी | Nov 21, 2011, 05:47AM IST
मधमाशी पालन व्यवसाय जोरात

पिशोर - कन्नड तालुक्यातील पिशोरमधील दोन शेतक-यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचा यात चांगला जम बसला असून त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे.

किमान 120 रुपये किलो दराने मधाची विक्री होते. महादू डहाळे व सिद्धार्थ शेजवळ या शेतक-यांनी महाबळेश्वर येथे मधमाशी पालन व्यवसायाचे 15 दिवस प्रशिक्षण घेतले. या व्यवसायासाठी खादी ग्रामोद्योगतर्फे कर्ज मिळते. यात 80 टक्के अनुदान असते, तर 20 टक्के रक्कम परतफेड करायची आहे. 45 हजार रुपयांना मधमाशांच्या 10 पेट्या मिळतात. या एका पेटीत 10 फे्रम तयार होतात. फे्रममध्ये एक एक करून मधमाशा शिरतात व मध जमा करतात. एका पेटीत 30 ते 40 हजार मधमाशा राहतात. या मधमाशांमध्ये एक राणी माशी राहते. या माशीचे जीवन 3 वर्षांचे असते. या माशा रोज दिवभर चार-पाच किलोमीटर फिरून परागकण व मकरंद जमा करतात. या मधमाशा पिकांना अधिक उपयुक्त असून त्यातून पिकांना पोषण मिळते. एवढेच नाही तर पिकांवर औषधांची फवारणी करण्याचीदेखील गरज पडत नाही.

पिशोरजवळील लिंबाजी चिंचोली या गावातील गणपत जाधव यांनी शेतात मधमाशांच्या 21 पेट्या ठेवलेल्या आहेत. त्यांनी शेतात सूर्यफुलाची लागवड केली असून मधमाशांमुळे पीक जोमात आहे. या माशांमुळे उत्पादनवाढीस मदत होते. या मधमाशांच्या एका पेटीतून 20 किलो मध निघतो. 10 पेट्यांचा 200 किलो मध यंत्राच्या साहाय्याने काढतात. हा मध शेतक-यांकडून विक्री झाला नाही तरी आम्ही तो 120 रुपये किलो दराने घेतो, असे मधुक्षेत्रिक बी. वाय. सिरसाठ यांनी सांगितले.

मधमाशी पालन व्यवसायाची ओळख - मधमाशी पालनाचे 15 दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यानंतर खादी ग्रामोद्योगतर्फे या व्यवसायासाठी अनुदान दिले जाते. त्यातील 80 टक्के रक्कम अनुदान असते, तर 20 टक्के रक्कम परतफेड करावी लागते. 45 हजारांना मधमाशांच्या 10 पेट्या मिळतात. एका पेटीत 20 किलो मध निघतो.

Email Print
0
Comment