कोर्टाच्या आवारातून अधिकार्याचे अपहरण

औरंगाबाद - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे शासन नियुक्त सदस्य डॉ. राहुल जवंजळ यांचे सोमवारी दुपारी 12.15 च्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आवारातून अपहरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर आघाडीचे प्रमुख डॉ. बाळासाहेब पवार यांचा स्वीय सहायक शंकर अडसूळ याने त्यांचे अपहरण केले असून पोलिसांनी पवार यांच्यासह सुमारे 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. पवार आणि अडसूळ हे दोघेही फरार झाले आहेत. खासगी महाविद्यालयांना शिष्यवृत्ती न देण्याच्या महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेसंदर्भात शपथपत्र सादर करण्यासाठी डॉ. जवंजळ औरंगाबादमध्ये आले होते.
मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे यांनी सांगितले की, खासगी नर्सिंग कॉलेजची शिष्यवृत्ती बंद करण्यात यावी, असा निर्णय गतवर्षी राज्य शासनाने घेतला. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका खासगी नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी दुपारी सुनावणी होती. यासाठी शनिवारी डॉ. राहुल जवंजळ आणि मंत्रालयाचे कक्ष अधिकारी स्वप्निल गोपाळराव बोरसे हे औरंगाबादेत आले होते. हे दोघेही अमरप्रीत हॉटेलमधील रूम नं. 109 मध्ये थांबले होते. सकाळी डॉ. जवंजळ आणि बोरसे शपथपत्र सादर करण्यासाठी खंडपीठात आले होते.
असे केले अपहरण - शपथपत्र सादर केल्यानंतर डॉ. जवंजळ आणि बोरसे दुपारी 12.15 च्या सुमारास कारमधूनच (एमएच-13 एझेड-4040) न्यायालयाबाहेर पडत असतानाच न्यायालयाच्या गेटमध्ये डॉ. पवार यांचा स्वीय सहायक शंकर अडसूळ याने त्यांची कार अडवली. कारमध्ये पाठीमागे बसलेल्या बोरसे यांना बाहेर खेचून अडसूळ आणि त्याच्यासोबतच्या चौघांनी कारचा ताबा घेतला. मात्र कार चालवत असलेल्या डॉ. जवंजळ यांनी कारचा ताबा सोडला नाही. त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करत अडसूळ व त्याच्या साथीदारांनी ‘आम्ही सांगतो तेथे कार घ्या’ असे सांगत डॉ. जवंजळ यांचे अपहरण केले. मात्र डॉ. जवंजाळ यांनी अडसूळच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करीत कार थेट अमरप्रीत हॉटेलपर्यंत नेली. तोपर्यंत अडसूळ आणि त्यांच्यासोबतचे चारही जण कारमध्ये बसून डॉ. जवंजाळ यांना दमदाटी करीतच होते. हॉटेल अमरप्रीतपर्यंत येताच डॉ. जवंजळ यांनी कार हॉटेलच्या दिशेने वळवली. हॉटेलमध्ये विद्यार्थी संघटनेचे काही कार्यकर्ते डॉ. जवंजळ यांना भेटण्यासाठी आलेले होते. या वेळी डॉ. जवंजाळ यांनी आरडाओरड केल्याने हे कार्यकर्ते कारच्या दिशेने धावले. हॉटेलसमोर कार थांबताच अडसूळ याने सहकार्यांसह धूम ठोकली.
बोरसेंनी दिली पोलिसांना माहिती - डॉ. जवंजळ यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याबाबत स्वप्निल बोरसे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हॉटेल अमरप्रीतमध्ये धाव घेतली. यानंतर डॉ. जवंजळ यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात जाऊन डॉ. पवार, अडसूळ आणि सुमारे 25 अनोळखी इसमांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या कलम 365 (अपहरण)आणि कलम 353 (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे), 504 (शिवीगाळ करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे.





