मराठवाड्याची रेल्वे क्रॉसिंगवर अडकली!

मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. गेल्या 150 वर्षांत तर 150 किलोमीटरचाही अतिरिक्त रूळ अंथरण्यात आलेला नाही. मराठवाड्यात दुहेरी रेल्वेमार्गाची (डबल लाइन) मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यासाठी शेकडो कोटी रुपये आवश्यक आहेत. मात्र, औरंगाबाद रेल्वेस्थानकाचे उत्पन्न तोकडे असल्यानेच दुहेरी मार्गाच्या मागणीकडे रेल्वे मंत्रालय गांभीर्याने लक्ष देत नाही. या प्रश्नाचा लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करूनही रेल्वे मंत्रालय दाद देत नाही. त्यामुळे समस्या कायम आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी तिला ‘बॅड लक ऑफ मराठवाडा’ असे नाव दिले आहे. डीबी स्टारने या संपूर्ण मुद्द्यांचा तपास केला.
महसूल नाही : औरंगाबाद रेल्वेस्थानकासह संपूर्ण मराठवाडा, रेल्वेला चांगला महसूल मिळवून देण्यात खूपच मागे आहे. नांदेडची परिस्थिती इतकी खालावली आहे की, यंदा हे स्थानक तोट्यात गेले. औरंगाबाद रेल्वेस्थानकाला एका प्रवासी गाडीपासून दररोज 13 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. याउलट मालगाडीपासून 45 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, स्थानकातून मोजक्याच मालगाड्या सुटतात.
व्यवसाय कमी : औरंगाबादमध्ये ना मोठे गोदाम आहेत ना धान्याचे मोठे कोठार. ना लोखंडाची उलाढाल आहे ना कोळशाच्या खाणी. साखर कारखान्यांमुळे एखादी मालगाडी भरते. बाकी संपूर्ण व्यवसाय पर्यटकांवरच अवलंबून आहे.
कोट्यवधींचा खर्च : जसजसी महागाई वाढत आहे तसतसा रेल्वे रूळ अंथरण्याचा खर्चही वेगाने वाढत चालला आहे. सध्या 1 किलोमीटर रेल्वे रूळ अंथरण्यासाठी 7 कोटी रुपये खर्च येत आहे. सध्या मनमाड ते नांदेडपर्यंत
दुहेरी रेल्वेमार्गाची गरज आहे. हे अंतर जवळपास 376 किलोमीटर आहे. 7 कोटी रुपये प्रती कि.मी. या हिशेबाने 2 हजार कोटी 632 कोटी रुपयांचा खर्च केवळ रूळ अंथरण्यासाठी लागणार आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम देण्यास सरकार हात आखडता घेत आहे.
कनेक्टिव्हिटी नाही : देशी-परदेशी पर्यटक येथे येऊ इच्छितात. मात्र, रेल्वे कनेक्टिव्हिटी जवळपास नसल्यासारखी आहे. त्यामुळे बहुतेक पर्यटक आणि प्रवासी रेल्वेऐवजी रस्त्यांवर धावणा-या वाहनांनी जाणे पसंत करतात. औरंगाबादहून थेट मुंबईला केवळ एक रेल्वे (जनशताब्दी एक्स्प्रेस) जाते. आता ही रेल्वेही वेळेवर मुंबईला पोहोचत नाही. प्रवाशांना मुंबईला पोहोचण्यास कधी साडेबारा, तर कधी दुपारचा 1 वाजत आहे. तसेच दिल्लीला जाण्यासाठीही सचखंड एक्स्प्रेसशिवाय कोणतीही रेल्वे नाही. पाटणा, अहमदाबाद, इंदूर, कोलकाता, चेन्नई, जयपूर, जोधपूर, बडोदा, चंदीगड या शहरांशीही औरंगाबादची कनेक्टव्हिटी नाही.
मोजक्याच रेल्वे : औरंगाबाद स्थानकातून दररोज 19 रेल्वे ये-जा करतात. त्यातील बहुतेक रेल्वेगाड्या क्रॉसिंगमुळे निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावतात. मग इतक्या कमी रेल्वेगाड्यांद्वारे महसूल वाढणारी तरी कसा?
खासदार चंद्रकांत खैरे यांना थेट सवाल
* मराठवाड्याच्या रेल्वे विकासाचा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जातो तेव्हा सर्वांचे लक्ष आपल्याकडे असते...
- मी अनेक वर्षांपासून रेल्वे विकासाच्या प्रश्नावर लढत आहे. लालूप्रसाद यादवांपासून ममता बॅनजी आणि नंतर दिनेश त्रिवेंदीपर्यंतच्या रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली. आपल्या मागण्या मांडल्या, पण काही फरक पडला नाही. जो काही विकास झाला आहे त्यासाठी प्रयत्न केले आहेत. जो विकास बाकी आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि सुरूच राहतील.
* तुमच्या पातळीवर काय मागणी आहे ?
- मनमाड ते मुदखेडपर्यंत दुहेरी मार्ग आणि विद्युतीकरण होणे अत्यावश्यक आहे. यंदा ते करवूनच घेईल. मग त्यासाठी कोणाशीही लढावे लागली तरी पर्वा नाही. त्याबरोबरच औरंगाबाद आणि नांदेड मध्य रेल्वेशी जोडणे गरजेचे आहे. त्याचा मराठी माणसाला फायदा होईल. सिकंदराबादवाल्यांना आपली भाषा समजत नाही. काही ट्रेन्स वाढवण्याचीही मागणी केली आहे.
* पुढे काय योजना आहे?
- आम्ही पूर्वीही संसदेत या प्रश्नावर अनेक वेळा आवाज उठवला आहे. कदाचित ती वेळ पुन्हा आली आहे. 17-18 एप्रिल रोजी मी रेल्वेमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली आहे. या वेळी काम नाही झाले नाही तर 24 एप्रिलपासून पुन्हा संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यात आवाज उठवू.
या आहेत नवीन शिफारशी
*मराठवाड्यात दुहेरी रेल्वेमार्गांसाठी पैसे नसतील तर त्याऐवजी प्रत्येक 30 किलोमीटर अंतरावर लूप लाइन टाकायला हवी. त्यामुळे जेव्हा क्रॉसिंगसाठी रेल्वे समोरासमोर येतील तेव्हा एका रेल्वेला लूप लाइनवर सरकवण्यात येईल आणि दुसरी गाडी मुख्य मार्गावरून पुढे निघून जाईल. असे झाल्यास दोन्ही गाड्यांचा वेग कायम राहील आणि कोणत्याही रेल्वेला क्रॉसिंगवर उभी राहण्याची गरज पडणार नाही. 30-30 किलोमीटरच्या रुळांचा खर्चही कमी येईल. - विलासचंद्र काबरा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे परिषद
शिफारस व्यवहार्य नाही - तांत्रिकदृष्ट्या लूप लाइनची व्यवस्था परिणामकारक नाही. अशा लाइनची सिग्नलिंग करता येत नाही. तसे पाहिले तर प्रत्येक 12 ते 14 किलोमीटर अंतरावर स्थानक आहे आणि तेथे रूळ दुहेरी होतात. त्यासाठी वेगळ्या लूप लाइनची गरजच नाही. पूर्णपणे दुहेरी मार्ग झाला तरच काहीतरी फायदा होईल. त्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. - अशोक निकम, व्यवस्थापक, औरंगाबाद रेल्वेस्थानक





