औरंगाबाद: महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. अत्याचाराविरुद्ध दाद कुठे व कशी मागायची याबाबत महिलांमध्ये अद्यापही जागृती झालेली नाही. तसेच अत्याचाराविरुद्ध ठोस कारवाई करण्यास पोलिस दुर्लक्ष करत असल्याने याचे प्रमाण वाढले असल्याची खंत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
बीड येथे आयोजित राज्यस्तरीय महिला मेळाव्यात ‘मुलींचे सातत्याने कमी होणारे प्रमाण, याविषयीच्या समस्या आणि उपाय’ यावर मार्गदर्शन करण्यासाठी शर्मा औरंगाबादेत आल्या आहेत. महिला आयोगाची कार्यपद्धती समजावून सांगताना त्या म्हणाल्या, अनेकदा पीडित महिला पुढे काय करावे हे माहीत नसल्याने अन्याय सहन करतात. जोपर्यंत त्या आमच्याकडे येणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना मदत करू शकत नाही. यासाठी महिलांनी पुढे येणे आवश्यक आहे. 6 महिन्यांच्या कार्यकाळात पंजाब, केरळ, राजस्थान आणि उत्तरांचल या राज्यांमध्ये महिलांचे अधिकार, सुरक्षा आणि कायदा ‘महिला अधिकार अभियान’याबाबत जनजागृतीसाठी पायलट प्रोजेक्ट 19 नोव्हेंबरपासून हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांना आधार मिळावा यासाठी महिला आयोग सातत्याने कार्यरत आहे. पोलिसांची त्यात महत्त्वाची भूमिका असल्याचा उल्लेख त्यांनी केला. महिला आयोग सातत्याने प्रकरणांचा पाठपुरावा करत असल्याने बर्याच अंशी यश आल्याचे त्या म्हणाल्या. या वेळी आयएएस अधिकारी अनिता अग्निहोत्री, काँग्रेस माजी शहराध्यक्ष जी. एस. ए. अन्सारी, सुभाष जाधव, नगरसेविका रेखा जैस्वाल यांची उपस्थिती होती.
शिफारशी करण्याचे काम
राष्ट्रीय महिला आयोग सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये येणार्या बातम्या आणि आयोगाकडे आलेल्या पीडित महिला यांचा अभ्यास करून कायद्यात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध विभागांना शिफारशी करत असते. 2005 चा महिला सुरक्षा कायदा आयोगाच्या शिफारशींमुळेच लागू झाला आहे.’’ अनिता अग्निहोत्री, आयएएस अधिकारी, महिला आयोग