जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad >> World Tobacco Day Special

जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन विशेष , महिन्याला 150 नवे मुख कर्करोगी

निखिल निरखी | May 31, 2012, 08:13AM IST
 
 


औरंगाबाद - तंबाखू, गुटख्याचे व्यसन असणार्‍यांमध्ये मुख कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, शहरात दर महिन्याला किमान शंभर ते दीडशे नवे कर्करोगी सापडत आहेत. सर्वांत गंभीर बाब म्हणजे यातील बहुतांश रुग्ण हे 35 ते 40 या वयोगटातील असून आता तर वयाच्या विसाव्या वर्षापासूनच हे रुग्ण सापडत आहेत. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण आले नाही तर पुढील पाच-दहा वर्षांत हे प्रमाण तिपटीने वाढू शकते, असा इशारा वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारी शरीराची गंभीर हानी व त्याचा औरंगाबादेत बसणारा फटका, याबाबत ‘दिव्य मराठी’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली. कुटुंबाची जबाबदारी पेलण्याच्या वयात, राष्ट्रनिर्मितीची धुरा असलेल्या तरुण वर्गाला गुटखा संस्कृतीने विळखा घातल्याचे वैद्यकतज्ज्ञांच्या निष्कर्षांवरून स्पष्ट झाले. या संदर्भात शहरातील कॅन्सर सर्जन डॉ. नवीन कासलीवाल म्हणाले, केवळ आमच्याकडे दर महिन्याला मुख कर्करोगाच्या 20 ते 25 नवीन रुग्णांचे निदान होते. हे प्रमाण औरंगाबाद शहरामध्ये किमान शंभर ते दीडशे असू शकते. यातील बहुतांश रुग्ण आजघडीला 35 ते 40 या वयोगटातील असले तरी आता चक्क विशीतले रुग्णही सापडत आहेत.

अलीकडेच औरंगाबादेतील 23 वर्षीय युवकाला मुख कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्याची केस हिस्टरी तपासली असता, त्याने वयाच्या 19 व्या वर्षी गुटख्याचे व्यसन सोडले होते. मात्र त्यापूर्वी तो किमान पाच ते सहा वर्षे गुटखा खात होता. त्यामुळे गुटखा सोडल्यानंतरही हा धोका काही प्रमाणात राहतो, हे स्पष्ट होते. रुग्णांच्या अभ्यासावरून मुख कर्करुग्णांमध्ये सात ते आठ वर्षे गुटखा खाण्याची हिस्टरी दिसून येते. तरीसुद्धा एक-दोन वर्षे गुटखा खाल्ल्यानंतरही कर्करोग होऊ शकतो. गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन दिवसेंदिवस वाढतच असून त्याला जात-धर्म-पंथाचे तसेच गरीब-श्रीमंतीचेही बंधन राहिलेले दिसत नाही. हे प्रमाण असेच राहिले तर येत्या पाच-दहा वर्षांत मुख कर्करोगाचे प्रमाण तिपटीपेक्षा वाढू शकते, असा धोक्याचा इशारा कासलीवाल यांनी दिला.

मुख कर्करोगावरील उपचार पद्धत - मुख कर्करोगाचा त्रास कमी होण्यासाठी वेगळी औषधी उपलब्ध आहे. तसेच सहनशीलतेच्या बाहेर वेदना होणार्‍यांसाठी ‘मॉरफिन’सारखी विशिष्ट पेन किलर्सही उपलब्ध आहेत. अलीकडे ‘टार्गेटेड थेरपी’ ही नवीन उपचार पद्धती उपलब्ध झाली असली तरी मुख कर्करोग्यांसाठी तिचा वापर अजूनही देशात कमीच होतोय. सध्या तरी ही उपचार पद्धत सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अशा रुग्णांसाठी शस्त्रक्रिया हा एक शाश्वत मार्ग आहे. नवनवीन उपकरणांमुळे शस्त्रक्रियांचा त्रास कमी करणे शक्य झाले आहे. यात अनेकदा रुग्णांचा जबडा काढावा लागतो आणि हे रुग्णांसाठी त्रासदायक असते. अशा केसेसमध्ये पायाचे हाड काढून त्या जागी बसवले जाते. मात्र जबड्याची नैसर्गिक स्थिती रुग्ण गमावून बसतो, अशा शब्दांत डॉ. कासलीवाल यांनी कर्करोगाची दाहकता विशद केली.

काय करणे गरजेचे? तंबाखूजन्य पदार्थांवर कितीही धोक्याच्या सूचना लिहिल्या तरी त्याचा काहीएक परिणाम होताना दिसत नाही. त्यासाठीच अगदी प्राथमिक शाळेपासून मुलांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. याचे किती गंभीर परिणाम आहेत हे समजावून सांगणे आवश्यक आहे. तसेच सरकारने त्याच्या निर्मितीवर बंधन घालणे किंवा असे पदार्थ विशिष्ट ठिकाणी मिळतील, अशा काही योजना करणे गरजेचे आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तंबाखूजन्य पदार्थांमुळे येते नपुंसकत्व - कुठल्याही स्वरूपातील तंबाखू सेवनामुळे नपुंसकत्व येऊ शकते. यामुळे लैंगिक कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊन ‘इरेक्टाइल डिस्फंक्शन’सारखे विकारही उद्भवू शकतात. तसेच तंबाखूमुळे जसा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो त्याच धर्तीवर शुक्राणूंची संख्या घटण्यातही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे डॉ. कासलीवाल यांनी सांगितले.

शहरात 100 कोटींचे तंबाखूजन्य पदार्थ वर्षभरात फस्त - तंबाखू पदार्थांवर महापालिकेकडून साडेतीन टक्के एलबीटी कर व जकात आकारली जाते. त्यानुसार 2011-12 मध्ये 50 कोटींची सिगारेट्स औरंगाबाद शहरात विक्रीसाठी आली. गुटखा, र्जदा व इतर तंबाखूजन्य पदार्थांवर एक टक्का कर आकारला जातो. यानुसार किमान 30 कोटींचा गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थ शहरात आले आहेत. याशिवाय किमान 40 टक्के चोरीचा माल शहरात येत असतो. या सगळ्यांचा आणि महापालिका हद्दीत नसलेल्या पंढरपूर व वाळूजचा विचार केला असता किमान शंभर-सव्वाशे कोटींचे वेगवेगळे तंबाखूजन्य पदार्थ गेल्या वर्षी शहरात आले आणि ते शहरवासीयांनी फस्त केले, असे स्पष्ट होते.

‘स्मोकर्स’ना धोका ‘मेजर स्ट्रोक’चा
- मेजर स्ट्रोक’ अर्थात गंभीर व तीव्र स्वरूपाचा पक्षाघात. असा झटका येणार्‍यांमध्ये 50 ते 60 टक्के रुग्ण हे ‘चेन स्मोकर्स’ असतात. ‘मेजर स्ट्रोक’मध्ये अध्र्या मेंदूचा रक्तपुरवठा बंद होतो. या प्रकारचे रुग्ण आता वयाच्या 22 व्या वर्षापासून सापडत आहेत. जो पक्षाघात पूर्वी वृद्धापकाळाचा विकार समजला जात होता, तोच विकार आता दुर्दैवाने विशीतही दिसत आहे. याला धूम्रपानाच्या अतिसेवनासह वाढते ताणतणाव या दोन मुख्य बाबी कारणीभूत ठरत आहेत. धूम्रपानामुळे मेंदूमधील मुख्य धमनी ब्लॉक होते व पक्षाघाताचा तीव्र झटका येतो. विडीमुळेही पक्षाघातासह गँगरिनचा मोठा धोका असतो. डॉ. देवदत्त देशमुख, मेंदूविकारतज्ज्ञ

रक्तगाठी होतात, वाहिन्या बंद पडतात - भारतीयांची मूळ शरीरचना, अरुंद रक्तवाहिन्या याचा विचार केला तर धूम्रपानाचा सोस अजिबात परवडणारा नाही. धूम्रपान करणार्‍यांमध्ये हृदयविकाराची शक्यता किमान पाच ते दहा पटींनी वाढण्याची शक्यता असते. केवळ धूम्रपानच नव्हे तर सर्व प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयविकाराची शक्यता कमालीची वाढू शकते. तंबाखूजन्य पदार्थांमुळे हृदयाकडे जाणार्‍या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रक्ताच्या गाठी निर्माण होतात. परिणामी वाहिन्या बंद पडतात. त्यामुळे अगदी विशीतल्या तरुणांमध्येही हृदयविकार सर्रास आढळतो आहे. तरुणांमध्ये हृदयविकार म्हणजे एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आघात आहे, असे म्हणता येईल. डॉ. विलास मगरकर, हृदयविकारतज्ज्ञ

मुख कर्करोगाची लक्षणे अशी - तोंडातील किंवा जिभेवरील अशी कोणतीही जखम, जी आठवडाभरानंतरही बरी होत नाही

अशी जखम दुखत नसते व बरीही होत नसते

पूर्वीच्या तुलनेत तोंड उघडणे कमी होते

तोंडात पांढरे किंवा लालसर चट्टे निर्माण होतात

गळ्यात छोटी-मोठी गाठ येणे

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
6 + 8

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment