मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले भाजपचे आमदार व आपले पुतणे धनंजय मुंडे यांना सत्तेचा हव्यास झाल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी केली. धनंजय मतदानासाठी पात्र झाल्यापासून आपल्यामुळेच सत्तेत आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे आपल्याला माहीत होते. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी पंकजाला तिकीट दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारताना केला.
मुंडे म्हणाले की, आपण लोकसभेवर निवडून गेल्यानंतर सात-आठ महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या काळात धनंजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्याची माहिती मला मिळाली. त्यामुळे विधानसभेचे तिकीट पंकजाला दिले. धनंजय यांनी आपल्या कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी शरद पवारांना साकडे घातले होते. मात्र पवारांनी आपले नाव सुचवल्याचे मुंडे म्हणाले. तरीही धनंजय यांना विधान परिषदेवर निवडून आणले. इतकेच नव्हे तर नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांचा व पंडितअण्णांचा सल्ला घेऊनच तिकीट वाटप केल्याचा दावा मुंडे यांनी या वेळी केला. परळीत नगराध्यक्षपदाबद्दल वाद निर्माण झाला असताना तुझा-माझा उमेदवार करण्यापेक्षा एका मुस्लिम अपक्षाला अध्यक्ष बनवू, असे आपण सुचवले होते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये वेगळा संदेशही जाईल, असे आपल्याला वाटत होते. पण धनंजयने ते धुडकावून लावले आणि तेव्हापासून ते राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत, असे मुंडे म्हणाले.
आपले बंधू पंडितअण्णा व धनंजय यांच्या पक्षातून जाण्याने भाजपला काहीच फरक पडलेला नाही. आजही जिल्ह्यातील 70 टक्के कार्यकर्ते आपल्याकडेच असल्याचा दावा मुंडे यांनी केला.
राष्ट्रवादीत ओबीसींचे खच्चीकरण : आमदार प्रकाश शेंडगे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या वृत्ताचा मुंडे यांनी इन्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार ओबीसींच्या खच्चीकरणाचे राजकारण करत आहेत. त्यामुळेच त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडून उपमुख्यमंत्रिपद काढून घेतल्याची टीकाही गोपीनाथ मुंडेंनी या वेळी केली.