मुंबई - मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण दोन दिवसांपूर्वीच राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. मात्र, हायकोर्टाने ज्ञात मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सांगून ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्याने त्यांनी बुधवारी तत्काळ पद सोडल्याचे मानले जात आहे.
सामाजिक कार्यकर्ता संजय तिवारी यांनी सिंह यांच्याविरुद्ध एक जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. यावर निकाल देताना हायकोर्टाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवावा, असे आदेश मुंबई पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिले. निकाल येताच मुंबई आणि दिल्ली काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या. वेगाने सूत्रे फिरली आणि सिंह यांना तत्काळ राजीनामा देण्यास सांगण्यात आले.
सिंह यांनी मुंबई प्रदेश अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यापासून त्यांच्या विरोधात गुरुदास कामत आणि समर्थकांनी आघाडीच उघडली होती. सिंह यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या कार्यकाळातील खाण घोटाळ्यात प्रचंड माया जमवल्याची कुजबुज काँग्रेस गोटात सर्रास होती. त्याच पार्श्वभूमीवर काही दक्ष नागरिकांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यामुळे कृपाशंकर गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत आल्याचे दिसतच होते. अखेर त्यांना याच कारणासाठी मुंबई प्रदेश अध्यक्षपद सोडावे लागले.
मी साधा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पद सोडताना माझ्या मनात थोडेही दु:ख नाही. यापुढेही काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी मी सतत काम करत राहीन. या पदावर असताना माझ्याविरुद्ध काही गट सक्रिय होते, असा प्रचार करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात तसे नव्हते. पक्षातील ज्येष्ठ नेते तसेच कार्यकर्ते अशा सर्वांनीच प्रदेश अध्यक्षपदाच्या काळात सहकार्य केल्याचे ते ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले.
संजय निरुपम यांना मुंबई प्रदेशाध्यक्षपद? - कृपाशंकरसिंह यांच्यावर हायकमांडची अवकृपा झाल्याने त्यांच्या जागेवर आता उत्तर भारतीयांपैकीच एखाद्या नेत्याची वर्णी लावली जाईल. काही दिवसांत कार्यकारिणीची फेररचना होऊन मुंबई अध्यक्षपदाची माळ संजय निरुपम यांच्या गळ्यात पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या काळात नाराज झालेल्या गुरुदास कामत गटाचे दिल्लीदरबारी वजन वाढू लागले असून झुकते माप मिळण्यास प्रारंभ झाल्याचे मानले जाते. दिल्लीत ऊठबस असलेले निरुपम यांना त्याचा फायदा होऊ शकतो.
मंत्रिमंडळात फेरबदल? - नुकत्याच झालेल्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा बुधवारी दिवसभर होती. या निवडणुकांमध्ये खराब कामगिरी करणा-या कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अर्धचंद्र देण्यात येणार असून त्यांच्या जागी नव्या चेह-यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. तथापि, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र अशा फेरबदलाला अधिकृत दुजोरा दिला नाही.
दोन दिवसांपूर्वीच राजीनामा - पराभवाची जबाबदारी स्वीकारून मी दोन दिवसांपूर्वीच पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्याकडे राजीनामा दिला होता. तो तो स्वीकारल्याचे त्यांनी बुधवारी कळवले. - कृपाशंकर सिंह, कॉँग्रेस नेते
कोणत्या गोष्टींमुळे आरोप करण्यात आले?
- कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे एकत्रित उत्पन्न 69 लाख 94 हजार 258 रुपये
- कृपाशंकर यांचे 18 बँकांमध्ये 100 कोटीपर्यंत व्यवहार
- 16 वर्षांत कृपाशंकर सिंहांच्या उत्पन्नात अफाट वाढ
- 2009 मध्ये कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्रमोहन सिंह याला शाहीद बलवा यांच्या डी.बी. रियाल्टीकडून साडे चार कोटी मिळाले.
- डी. बी. रियाल्टीकडून तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम नरेंद्रमोहन सिंह याच्या खात्यात जमा झाली.
- झारखंडचे खाण घोटाळा फेम मुख्यमंत्र्यांचे सहकारी कमलेश सिंह यांच्या मुलीबरोबर नरेंद्रमोहन सिंहांचे लग्न
- नरेंद्रमोहनच्या लग्नासाठी सिंह कुटुंबीयांचे व-हाड नऊ विमानांनी रांचीला गेल
- झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या हवाला प्रकरणातही कृपाशंकर सिंह यांना पैसा मिळाल्याचा आरोप