अवघ्या 40 सेकंदात तो मुले पळवायचा!

मुंबई- सीएसटीवरुन महिन्याभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या 3 वर्षाच्या संगीताचा अखेर शोध लागला आहे. संगीता हरिद्वारमध्ये सापडली असून तिच्या अपहरणकर्त्यालाही ताब्यात घेतल्याची माहिती हरिद्वार पोलिसांनी दिली आहे. हरिद्वारच्या बस स्थानकाजवळ पोलिसांना संगीता सापडली. तिचे अपहरण करणा-याचे नाव राजू असे आहे. भीक मागण्यासाठी संगीताचे अपहरण करण्यात आल्याचे राजूने सांगितले. राजू हा मुळचा भोपाळ येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीएसटी येथून काही वर्षांमध्ये पळविण्यात आलेल्या मुलांमध्ये राजुचाच हात आहे काय, या दिशेने आता तपास करण्यात येणार आहे. राजू अतिशय शिताफीने मुले पळवायचा. संधी साधून अवघ्या 40 सेकंदांमध्येच तो काम फत्ते करायचा.
परभणीच्या पुष्पा आणि लक्ष्मण पवार या दांपत्याची मुलगी संगीता हिचे 10 जून रोजी सीएसटी रेल्वे स्थानकावरुन अपहरण झाले होते. मुंबईत काम शोधण्यासाठी हे दांपत्य आले होते. परंतु, फारसे काही न जमल्यामुळे त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. परंतु, सीएसटी स्थानकावर त्यांच्या मुलीला एका भामट्याने झोपेमध्ये उचलून नेले. देवगिरी एक्सप्रेस सुटल्यामुळे सकाळच्या तपोवन एक्सप्रेसनं परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. हा निर्णय त्यांना महागात पडला. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये एका विकलांग व्यक्तीने संगीताला उचलून नेल्याचे दिसून आले. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली.
असा लागला शोध
हरिद्वारमधल्या एका पोलिसाला एक इसम संगीताला घेऊन जात असताना दिसला. त्याला पोलिसांनी हटकल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. हा प्रकार पोलिसाला संशयास्पद वाटला. पोलिसांनी त्याची पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी केली आणि खरा प्रकार उघड झाला. पोलिसांनी मुंबई पोलिसांना संपर्क करुन याबाबत माहिती दिली.
ही मुलगी संगीताच आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी आणि तिला परत आणण्यासाठी रेल्वे पोलिसांची टीम हरिद्वारला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक (रेल्वे पोलिस) सुरेंद्रनाथ देशमुख यांनी दिली.






