
मुंबई - कॉंग्रेसचे माजी खासदार आणि हिंगोली कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी शुक्रवारी केलेला दावा खरा ठरला. पिचड यांच्या वक्तव्याने राजकीय वतरुळात चर्चांना उधाण आले होते. माने हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत.
पिचड यांनी सांगलीत ही घोषणा केली होती. शनिवारी सकाळी 10 वाजता हा पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयाला पत्रकारांनी गराडा घातला; परंतु हाती काहीच आले नाही. राष्ट्रवादीच्या मंत्री, खासदारांशी संपर्क साधला; परंतु कोणीच काही ठोस सांगण्यास तयार नव्हते. आपण ‘गेस’ करत असल्याचेच त्यांचे उत्तर होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्तूळातून मात्र हा खासदार विद्यमान नसून, माजी असल्याचे सांगितले जात होते.
बहुजन विकास आघाडीचे खासदार बळीराम जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, कोल्हापुरातून अपक्ष निवडून आलेले सदाशिवराव मंडलिक अशा नावांची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ वतरुळातून मात्र या नावांची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात होते. जाधव यांचा केंद्रातील सत्ताधारी यूपीए आघाडीला पाठिंबा आहे. शेट्टी आणि राष्ट्रवादीतील वैर सर्वविदित आहे. मंडलिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यातच हिंगोलीचे माजी खासदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माने यांचेही नाव चर्चेत होते. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.