मुंबई - त्रिशंकू अवस्थेत असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदी कोण बसणार? याबाबतचा पेच अद्याप सुटला नसतानाच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला महापौर करत असाल तर चार नगरसेवकांचा पाठिंबा देतो, अशी ऑफरही त्यांनी भुजबळांना दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या नव्या समीकरणविषयी चर्चेला ऊत आला होता.
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, शिवसेना जोवर आपली भूमिका ठोसपणे पुढे आणत नाही तोवर हा पेच सुटणार नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी याबाबत लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी. नाशिक महापालिकेमध्ये रिपाइंचे तीन नगरसेवक आणि रिपाइं पुरस्कृत एक असे चार जण निवडून आले आहेत. या चौघांचा पाठिंबा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला द्यायला आठवले तयार असून त्यासाठी महापौरपद आपल्याकडे द्यावे, अशी मागणी त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. एकीकडे शिवसेना-भाजपबरोबर महायुती करणा-या आठवले यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या तंबूमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
महायुतीमध्ये जाऊनही मुंबई महापालिकेमध्ये आठवले गटाला यश मिळाले नसले तरी विधानसभा निवडणूक युतीबरोबरच लढवणार असल्याचे ते सांगतात. पण त्याच वेळी भुजबळांनाही जाऊन भेटतात त्यामुळे राजकीय समीकरणांबाबत विविध तर्क लढवले जात आहेत. अद्याप भुजबळ यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीला 20, तर काँग्रेसला 15 जागा मिळाल्या असून त्यांची आघाडी आहे. शिवसेनेला 19 तर भाजपला 14 जागा मिळाल्या असल्या तरी तिथे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते, तर मनसेला 40 जागा मिळाल्या आहेत. नाशिक महापालिकेमध्ये महापौर बसवण्यासाठी 62 नगरसेवकांचा आकडा गाठायचा असल्याने विविध राजकीय समीकरणे जुळवली जात आहेत. मनसे व भाजप कदाचित बरोबर जातील, असेही बोलले जाते.
मनसेबाबत शिवसेनाच ठरवेल : भुजबळ - आठवलेंनी भेट घेण्यापूर्वी भुजबळ यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले होते की, नाशिकमध्ये मनसेचा महापौर बसेल की नाही हे शिवसेनेचा ठरवणार आहे. भाजपला मनसेबरोबर जायचे असल्यास युतीतील प्रमुख पक्ष शिवसेना त्याबाबत काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. जनतेने सर्वच पक्षांना समान न्याय दिल्याने राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीही महापौरपदाच्या शर्यतीत असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.